चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुरवण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने त्यासाठी ‘चारधाम ट्रॅव्हल्स तिकीट’ नावाचे संकेतस्थळ तयार केले होते. तसेच पवनहंस कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून आरोपीने व्यावसायिकाची फसवणूक केली. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा >>> मुंबई : राज्य सरकारच्या विरोधात शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम
तक्रारदार राधेश्याम खंडेलवाल (५०) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांना कुटुंबियासमवेत चारधाम यात्रेला जायचे होते. त्यासाठी ते संकेतस्थळाचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना ‘चारधाम ट्रॅव्हल्स तिकीट’ नावाचे एक संकेस्थळ आढळले. त्यावर अंशुमन साहू नावाच्या प्रतिनिधीचा मोबाइल क्रमांक देण्यात आला होता. खंडेलवाल यांनी साहूशी संपर्क साधला असता त्याने प्रवाशांची नावे आणि आधारकार्ड ई-मेल करण्याची सूचना केली साहूच्या सूचनेनुसार खंडेलवाल यांनी २५ मे रोजी सात जणांची नावे ई-मेल केली. त्यानंतर त्याने खंडेलवार यांना बँक खात्यावर ५४ हजार २५० रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टर सेवेसाठी आणखी १३ जणांची नावे व आधारकार्ड साहूने सांगितलेल्या ई-मेलवर पाठवली. त्यावेळी साहूने त्यांना बँक खात्यावर एक लाख ७५० रुपये जमा करण्यास सांगितले. साहूने सांगितलेल्या बँक खात्यावर खंडेलवाल यांनी ही रक्कम जमा केली. त्यानंतर साहूने तक्रारदार खंडेलवाल यांना एक लिंक पाठवली. त्यावर तपासणी केली असता पीएनआर क्रमांकावरून प्रवाशांची नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा >>> उद्योग, मुख्यालये महाराष्ट्राबाहेर नेण्याची परंपरा कायम
त्यामुळे नोंदणी झाल्याची खंडेलवाल यांना खात्री झाली. केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर हेलिकॉप्टरने पुढील प्रवास करण्यासाठी खंडेलवाल गेले. मात्र साहूने दिलेली तिकीटे बनावट असल्याचे उघड होताच त्यांन धक्का बसला. ‘चारधाम ट्रॅव्हल्स’ नावाने आपले कोणतेही संकेस्थळ नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर खंडेलवाल यांनी साहूशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बंद होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे खंडेलवाल यांच्या लक्षात आले. मुंबईत परल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.