आयुर्वेदिक महाविद्यालयात मुलीच्या प्रवेशासाठी आलेल्या आई आणि मुलीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या एका भामटय़ाला मुंबई पोलिसांनी बेंगळुरू येथून अटक केली. पुण्याहून आलेल्या या मायलेकींची ओळख या भामटय़ाबरोबर रेल्वे तिकिटाच्या रांगेत झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा मुंबईत भेटलेल्या या भामटय़ाने या दोघींना बँडस्टँड येथे नेऊन तेथे गुंगीचे औषध दिले व त्यांच्याकडील दागिने व मोबाइल घेऊन पोबारा केला. अखेर पोलिसांनी या चोराचे मोबाइल लोकेशन शोधून त्याला बेंगळुरूतून अटक केली.
पुण्यातील येरवडा येथे राहणाऱ्या डॉ. कमल चर्नालिया आपल्या मुलीच्या प्रवेशासाठी  पोदार आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालयात २४ ऑक्टोबर रोजी मुलीसह आल्या होत्या. त्यावेळी  तिकिटाच्या रांगेत उभ्या असताना या दोघींची ओळख रांगेतील मनोजकुमार गुप्ता या लंगडय़ा माणसाशी झाली. डॉ. कमल व त्यांची मुलगी पुन्हा दोन दिवसांनी प्रवेशाच्याच कामासाठी मुंबईला आल्या. परतीच्या प्रवासासाठी दादर येथे प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट बघत असताना त्यांना पुन्हा मनोजकुमार भेटला. हाजीअली येथे फिरायला जाऊ या, असे सांगत त्याने या दोघींना आधी वरळी सी-फेस येथे नेले. तेथून जुहू चौपाटीला जाऊ या, असे सांगून त्याने बँडस्टँड येथे शाहरूख खानच्या बंगल्यासमोर दोघींना आणले. तेथे तो या दोघींसाठी शीतपेय विकत घ्यायला गेला. आणलेल्या ६०० मिली बाटलीचे झाकण उघडून त्याने एक घोट स्वत: पिऊन उर्वरित पेय मायलेकींना प्यायला दिले. हे पेय प्यायल्यावर दोघींची शुद्ध हरपली.
डॉ. कमल शुद्धीवर आल्या त्या वेळी आपण आपल्या मुलीसह भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे त्यांना समजले. दरम्यानच्या काळात त्यांच्या हातातील सोन्याच्या चार बांगडय़ा, चार कानातले आणि सॅमसंग कंपनीचा मोबाइल असा ९० हजार रुपयांचा ऐवज मनोजकुमारने लंपास केल्याचे लक्षात आले. या दोघींनी ताबडतोब वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वांद्रे पोलिसांनी मनोजकुमारच्या मोबाइल लोकेशनवरून हा आरोपी बेंगळुरू येथील बीटीएम परिसरात फिरत असल्याचे पोलिसांना कळले. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासह एक पथक बेंगळुरूला पाठवले. मुंबई पोलिसांनी सापळा लावून अखेर मनोजकुमारला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा