लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : आध्यात्मिक गुरूचा पणतू असून दैवी शक्ती असल्याची बतावणी करत एका व्यक्तीने ९८ वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या मुलाच्या खात्यातून ४२ लाख ५० हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या वयोवृद्ध डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून संजय साटम नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दादर पूर्वेकडील दादासाहेब फाळके रोड परिसरात राहत असलेले ९८ वर्षीय तक्रारदार डॉक्टर हे एका आध्यात्मिक गुरूंचे भक्त आहेत. काही वर्षांपूर्वी एका वैद्यकीय शिबिरादरम्यान आरोपीसोबत तक्रारदार डॉक्टरची ओळख झाली होती. त्याने आपण संजय साटम असून त्यांचे आजोबा आध्यात्मिक गुरू असल्याचे सांगितले. तक्रारदार डॉक्टर त्यांचे भक्त असल्यामुळे त्यांनी तात्काळ संजय साटमवर विश्वास ठेवला. त्यांनी आपण डॉक्टर असून ओझोन थेरेपी, सेलेशन थेरेपीचे उपचार करतो. मला डोळ्यांचा आजार आहे. तर, माझा मुलगा मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी संजयला सांगितले. काही दिवसांनी आरोपी संजय हा तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला वैद्यकिय मदतीसाठी येऊन भेटला. यावेळी त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पी.एचडी. केल्याचे आणि आंतरराष्ट्रीय वकील असल्याचे सांगितले.
आणखी वाचा-कोकण रेल्वे करणार केनियातील रेल्वेची देखभाल-दुरुस्ती
सर्वोच्च न्यायालयात त्याचे कार्यालय असून हाताखाली बरेच वकील काम करत आहेत. पूर्वी तो फ्रान्समध्ये राजदूत होता. त्याचे नाव गोव्याचे राज्यपाल म्हणून अंतिम टप्प्यात आले होते. पोर्तुगालला जाण्यासाठी भारत सरकारने त्याला वाणिज्य वकिलातीचा सदस्य म्हणून त्याची नेमणूक केल्याचे सांगितले. तसेच, आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर त्याचे मावस भाऊ असल्याचे सांगत त्याचे उच्चस्तरावरील व्यक्तींसोबत चांगले संबंध असल्याचेही सांगितले.
संजय हा स्वतःच्या वैद्यकीय समस्या सांगून तक्रारदार यांच्या घरी येऊ लागला. पैसे न देताच ओझोन आणि सेलेशन थेरेपी करुन घेत होता. तक्रारदार डॉक्टर आणि त्यांच्या मुलांशी चांगली ओळख वाढविल्यानंतर तो तक्रारदार डॉक्टर आणि त्यांच्या मुलांचे बँकेतील व्यवहार सांभाळू लागला. याच दरम्यान त्याने तक्रारदार डॉक्टर यांच्या खात्यातून एनईएफटी, आरटीजीएस, गुगल पे या माध्यमातून एकूण २९ लाख ५० हजार रुपये रक्कम हस्तांतरीत करुन घेतली.
आणखी वाचा-शीव रुग्णालय अपघात प्रकरण : डॉ. ढेरे यांना रुग्णालयात येण्यास बंदी घालण्याची मागणी
तक्रारदार डॉक्टर यांच्या मुलाच्या खात्यातून १३ लाख रुपये वळते करुन घेतले. तक्रारदार डॉक्टर यांनी बँक खात्याच्या केलेल्या तपासणीत खात्यातील रक्कमेत तफावत जाणवली आणि संजय यानेच या रक्कमेची अफरातफर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रारदार डॉक्टर यांनी संजयला विचारणा केली असता त्याने अडचणीमुळे पैसे घेतल्याचे कबूल करत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याने पैसे परत न केल्याने तक्रारदार डॉक्टर यांनी भोईवाडा पोलीस ठाणे गाठून संजय विरोधात एकूण ४२ लाख ५० हजार रुपयांच्या आर्थिक फसवणूकीची तक्रार दिली आहे.