मुंबईः अर्धवेळ नोकरीचे आमिश दाखवून ३९ वर्षीय चित्रपट कलाकाराची सहा लाख रुपयांची फसवणकू करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार जोगेश्वरी पश्चिम येथील रहिवासी आहेत. ते खार येथील एका स्टुडिओमध्ये कामाला आहेत. त्यांना टेलिग्रामवर अर्धवेळ नोकरीबाबत संदेश आला होता. तक्रारदारांनी होकार दर्शवल्यानंतर त्यांना एअर बीएनबी या ॲप्लिकेशनची लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकद्वारे तक्रारदारांनी मोबाईलमध्ये ते ॲप्लिकेशन डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांना एक टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केल्यानंतर नफा म्हणून तक्रारदारांना एक हजार रुपये देण्यात आले.
दुसऱ्या टास्कच्या वेळी तक्रारदारांना ११ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदारांनी ती रक्कम भरली. त्यानंतर त्यांनी केलेल्या कामाचा नफा म्हणून त्यांना १८ हजार २८३ रुपये पाठवण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराला पुन्हा २९ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यावरील नफा म्हणून तक्रारदारांना ३७ हजार ९६५ रुपये देण्यात आले.
हेही वाचा >>>अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक
त्यानंतर तक्रारदारांना ७९ हजार ५३८, २९ हजार, एक लाख ३५ हजार व तीन लाख ५३ हजार रुपये भरण्यात सांगण्यात आले. पण त्या रकमेवरील नफा तक्रारदारांना मिळालाच नाही. तक्रारदारांकडून एकूण पाच लाख ९७ हजार रुपये विविध खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले होते. ही रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केल्यानंतर नफ्याची रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी खार पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींनी वापरलेल्या विविध बँक खात्यांची माहिती पोलिसांनी बँकेकडून मागवली आहे. त्याद्वारे तपास सुरू आहे.