मुंबईः सरकारी कोट्यातून स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून शीव येथील व्यावासायिकासह इतरांची २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने पुरुषोत्ताम चव्हाण यांच्यासह ११ जणांविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी चव्हाण हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा पती आहे. सक्तवसुली संचलनालय (ईडी) तपास करीत असलेल्या २६३ कोटींच्या प्राप्तिकर गैरव्यवहाराप्रकरणी चव्हाण याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्या प्रकरणाच्या तपासात ईडीला या गैरव्यवहाराची माहिती मिळाली होती.
आर्थिक गुन्हे शाखेने या कथित फसवणुकीप्रकरणी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर गुरुवारी याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. चव्हाण यांच्यासह तोतया अधिकारी प्रसाद देसाई, संजय पाटील, गणेश पाटील, दीपक मोरे, एन.डी. निर्मले. गोविंद सावंत, शशांक लिमये, यशवंत पवार, सह दुय्यम अधिकारी (खरा अथवा तोतया अधिकारी) व कागदपत्रे बनवण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शीव येथील व्यावसायिक केदार डेगवेकर यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी पुरुषोत्तम चव्हाण यांनी तक्रारदार आणि इतर लोकांना फसवले, असा आरोप आहे. आरोपीने सरकारी कोट्यातील सदनिका सवलतीच्या दरात विकण्याचे खोटे आश्वासन दिले होते. तक्रारदारांना दाखवण्यात आलेल्या विविध प्रकल्पापैकी प्रभादेवी येथील प्रकल्पातील ३ बीएसके सदनिका त्यांना पसंत पडली. त्याचा बाजारभाव सात ते साडेसात कोटी रुपये होता. पण ती सदनिका साडेतीन कोटी रुपयांमध्ये सरकारी कोट्यातून मिळणार होती. त्यासाठी तक्रारदारांनी चव्हाण यांच्या खात्यावर रक्कम जमा केली. याप्रकरणी ईडीने चव्हाण यांच्या कुलाबा येथील घरावर शोध मोहीम राबवली. त्यावेळी त्यांना अशा विविध व्यवहारांची कागदपत्रे सापडली. ती आर्थिक गुन्हे शाखेला दिली असता तक्रारदारांसह इतर १९ जणांकडून अशा प्रकार एकूण २४ कोटी ७८ लाख ६६ हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले.
फसवणूक झालेल्या व्यक्तींना बनावट ॲग्रिमेंट फॉर सेल देण्यात आले होते. त्यात इतर आरोपींचे सरकारी अधिकारी म्हणून नाव नोंदवण्यात आले होते. याप्रकरणी चव्हाण आणि इतर आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४१९ (प्रतिरूप देऊन फसवणूक करणे), ४६५ (खोटी कागदपत्रे तयार करणे), ४६७ (मूल्यवान कागदपत्रांची बनावट नोंदणी करणे), ४६८ (फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रे तयार करणे), ४७१ (बनावट कागदपत्रांना खरी असल्याचे दाखवून वापरणे) आणि १२० (ब) (फौजदारी कट रचणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे. आरोपी पुरुषोत्तम चव्हाण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा पती आहे. दरम्यान, महिला पोलीस अधिकाऱ्याने मानसिक क्रूरता,आर्थिक छळ, पतीचे बायपोलर डिसऑर्डर व आर्थिक व्यवहार लपवल्याप्रकरणी गेल्यावर्षी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
ईडीच्या तपासात उघड झाला प्रकार
२६३ कोटी रुपयांच्या बनावट कर परतावा गैरव्यवहाराप्रकरणी तपासात ईडीने छापे टाकले होते. त्यात पोलिसांना संबंधित कागदपत्रे सापडली. त्यावरून हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर ईडीने याप्रकरणी मुंबई पोलिसांना संंबधित कागदपत्रे पाठवली होती. चव्हाण सध्या ईडीच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.