लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : विमान कंपनीत कामाला असल्याची बतावणी करून काश्मिरची सहल स्वस्तात करून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने जे.जे. मार्ग परिसरात वास्तव्यास असलेल्या इंटेरिअर डिझायनरची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी ५० वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार गॅब्रीयल दुबे (५२) जे.जे. रुग्णालय कंपाऊंड येथील त्रिमूर्ती इमारतीत वास्तव्यास आहेत. तक्रारीनुसार, शीव परिसरात वास्तव्यास असलेले त्यांचे परिचित उमेश सहानी याने तो एअर इंडियात कामाला असल्याचे त्यांना सांगितले. सहानीने मार्च ते मे २०२४ या कालावधीत दुबे व त्यांच्या कुटुंबियांना काश्मिरमध्ये जाण्या – येण्याचे तिकीट, राहण्याची व्यवस्था स्वस्तात करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे दुबे यांनी तिकीटासाठी दोन लाख आठ हार रुपये सहानीला दिले. तसेच काश्मिरमध्ये राहणे, खाणे व फिरण्याच्या व्यवस्थेसाठी एक लाख पाच हजार रुपये दिले. तक्रारदार दुबे यांनी एकूण तीन लाख १३ हजार रुपये आरोपीला दिले.

आणखी वाचा-‘टी – २०’ विश्वचषकाच्या विजयोत्सवाने मुंबई दुमदुमली

आरोपीने १२ हजार रुपायांची रेल्वेची तिकिटे काढली. उर्वरित रकमेतून आरोपीने तक्रारदारांची राहण्याची, फिरण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. तसेच विमानाचे तिकीटही काढले नाही. याबाबत दुबे यांना अंधारात ठेवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या रकमेची मागणी केली असता सहानीने तक्रारदारांना धनादेश दिला. बँक खात्यात पैसे नसल्यामुळे तो वठला नाही. अखेर याप्रकरणी तक्रारदाराने जे.जे. मार्ग पोलिसांककडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.