मुंबई: क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत – पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमवर जाऊन हा सामना पाहण्याची इच्छा ३२ वर्षीय महिला डॉक्टरला भलतीच महाग पडली. भामट्याने तिची क्रिकेट तिकीटांच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केली असून याप्रकरणी महिला डॉक्टरने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार डॉक्टर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील रहिवासी आहे. ती पुण्यातील एका प्रसिद्ध वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेत प्राध्यापिका असून नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. तक्रारीनुसार, अहमदाबादमध्ये शनिवारी होणाऱ्या भारत – पाकिस्तान विश्वचषक सामन्याची तिकिटे शोधताना वरिष्ठांच्या ओळखीतून भावदीप शाह या व्यक्तीचा संपर्क क्रमांक मिळाला. तक्रारदार डॉक्टरने ५ सप्टेंबर रोजी शहाला दूरध्वनी केला. सामन्यांच्या तिकीटांची व्यवस्था करू शकतो, त्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये लागतील असे त्याने सांगितले. पण तडजोडीअंती त्याने १५ हजार रुपयांमध्ये एक तिकीट देण्याचे मान्य केले. तक्रादार डॉक्टरांनी तीन तिकीटांचे पैसे पाठवले. त्याबदल्यात शाहने व्हॉट्सॲपवर तिकिटांचे छायाचित्र पाठवले. तसेच सामन्यापूर्वी तिकीटे देण्यात येतील असे त्याने सांगितेल.
तिकिटांचे छायाचित्र पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या इतर मित्रांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची तिकिटे हवी आहेत का, अशी विचारणा केली. त्यानंतर महिला डॉक्टरने शहा याला ऑनलाइन पैसे पाठवून आणखी पाच तिकिटे खरेदी केली, असे पोलिसांनी सांगितले. पैसे स्वीकारल्यानंतर शहाने तिला कुरिअरने तिकीट पाठवतो असे सांगितले आणि नंतर कुरिअरसाठी आणखी पैसे उकळले आणि इतर शुल्क घेतले.
५ ऑक्टोबरपर्यंत सर्व तिकिटे तिच्या पत्त्यावर पोहोचतील असे शाह यांनी तिला सांगितले. मात्र ५ ऑक्टोबरला तिकीट मिळाले नाही. डॉक्टरांनी शहा यांना दूरध्वनी केला असता, तिकिटाचे दर वाढल्याचे सांगत त्यांनी आणखी पैशांची मागणी केली. डॉक्टरांनी शाहला आणखी पैसे दिले. परंतु डॉक्टरांना तिकिटे मिळाली नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे.
डॉक्टरांनी शाह याच्या कार्यालयाचा कांदिवली येथील पत्ता मिळवला आणि त्या तेथे पोहोचल्या. ते शाहचे घर असल्याचे निष्पन्न झाले, परंतु तो तेथे सापडला नाही. यानंतर पीडित डॉक्टरने शुक्रवारी समता नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार केली. पोलिसांनी शाह यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) नुसार गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.