मुंबई : लोकायुक्त आणि उप लोकायुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि लेटर हेडच्या मदतीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मरीन ड्राइव्ह येथील लोकायुक्त आणि उप लोकायुक्त कार्यालयातील अधिकारी रवीद्र मारूती सांमत (५३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी छत्रपती संभाजी नगरचे महेंद्र रघुनाथ वाव्हळेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, लोकायुक्त कार्यालयात महेंद्र रघुनाथ वाव्हळे आणि विरोधक सोमनाथ भगवान जाधव यांच्यातील एका प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाच, वाव्हळेने फसवणुकीच्या उद्देशाने स्वतःच्या बाजूने असलेली नोटीस बनवून जाधव यांच्यापर्यंत पोहचवली. यामध्ये लोकायुक्त आणि उप लोकायुक्त कार्यालयाचे लेटर हेड आणि सामंत यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करण्यात आला. जाधव यांच्याकडून या नोटीसबाबत समजताच ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले. सामंत यांनी मंगळवारी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार वाव्हळेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.