केवायसी अपडेटच्या नावाने एका ३१ वर्षांच्या व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. अंधेरी येथे ३१ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि वडिलांसोबत राहत असून ते एका खाजगी कंपनीतील विक्री विभागात काम करतात. त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी तिला मोबाइलवर एक संदेश आला. हा संदेश तिने तिच्या पतीला पाठवला. त्यात त्यांना केवायसी अपडेटसंदर्भात माहिती देण्यात आली होती. सोबत एक लिंक होती. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना त्यांच्या बँकेचे संकेतस्थळ दिसले. त्यात त्यांनी वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती नमुद केली.
काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक आला. हा ओटीपी क्रमांक नोंद केल्यानंतर काही क्षणात त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून सुमारे ९३ हजार रुपये हस्तांतरित झाले. खात्यातून रक्कम हस्तातरित झाल्याचा संदेश येताच त्यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बँकेशी संपर्क साधून त्यांचे बँक खाते बंद करण्याची विनंती केली. या घटनेनंतर त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलमांनुसार गुन्हा नोंदविला. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.