हॉटेलच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून ग्राहकांची फसवणूक; बनावट संकेतस्थळांच्या संख्येत ३०४ टक्क्यांनी वाढ | fraud with customers by creating fake websites in the name of hotels mumbai print news zws 70
मुंबई : हॉटेलचे छायाचित्र व लोगोचा वापर करून तयार केलेल्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फसवणूक झालेल्या ग्राहकाच्या बँक व्यवहारांच्या माहितीच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
साई पॅलेस हॉटेलचे महाव्यवस्थापक गणेश भंडारी (६४) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी फसवणूक, तोतयागिरी करणे, बनावट लोगो तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गणेश भंडारी यांचे अंधेरीमध्ये हॉटेल आहे. हॉटेलमधील खोल्या व सभागृहाची नोंदणी करता यावी यासाठी त्यांनी हॉटेलची गुगलवर नोंदणी करून एक संकेतस्थळ तयार केले होते. त्यात हॉटेलचे छायाचित्र आणि लोगोचा वापर करण्यात आला होता. त्याद्वारे ग्राहक त्यांच्या हॉटेलमध्ये खोल्या भाड्याने घेऊ शकतात. भंडारी यांच्या हॉटेलमध्ये २४ जून रोजी विदान शहा नावाचा ग्राहक आला. त्याने ऑनलाईन पद्धतीने हॉटेलमध्ये दोन खोल्या भाड्यावर घेतल्याचे सांगितले. त्यासाठी शहा यांनी सात हजार रुपयेही यूपीआयद्वारे भरले होते. शहा यांनी यूआरएल लिंकचा वापर करून व्यवहार केला होता.
हेही वाचा >>> धारावीतील इमारतींच्या बांधकाम खर्चापोटी ६५० कोटी रुपये द्या; म्हाडा लवकरच करणार डीआरपीकडे मागणी
भंडारी यांनी त्या यूआरएलची पडताळणी केली असता साईपॅलेस नावाच्या दुसऱ्याच हॉटेलच्या संकेतस्थळावर ते पोहोचले. पण त्यांनी पाहणी केली असता त्या संकेतस्थळावर भंडारी यांच्या हॉटेलची छायाचित्रे व लोगोचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर जुलै महिन्यातही अशाप्रकारे चार – पाच ग्राहक त्यांच्या हॉटेलमध्ये आले. त्यांनीही त्याच संकेतस्थळाच्या माध्यमातून व्यवहार केले होते. भंडारी यांनी संबंधित संकेतस्थळाबाबत त्यांच्या टेक्निकल विभागाला विचारले असता हॉटेलचे छायाचित्र, लोगो व स्थळ यांचा वापर करून बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध ग्राहकांकडून सुमारे ६० हजार रुपये घेण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भंडारी यांनी याप्रकरणी अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ग्राहकांनी रक्कम भरलेली बँक खाती व इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे पोलिसांनी याबाबतची माहिती मागवली असून त्याद्वारे तपास सुरू आहे.
हेही वाचा >>> मुंबई: ३५ वर्षांपूर्वी छापा टाकून जप्त केलेले १.४८ लाख रुपये सव्याज परत करा – उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश
बनावट संकेतस्थळांच्या संख्येत ३०४ टक्क्यांनी वाढ ग्रुप आयबीने नुकताच ‘डिजिटल रिस्क ट्रेंड, २०२३’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार कंपनी अथवा संस्थांच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करण्याच्या प्रकरणांमध्ये ३०४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय ‘फिशिंग’ या सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या संकेतस्थळांमध्येही ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वित्तीय संस्थांच्या नावाने बनावट पेजेस तयार करण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्याचे प्रमाण सुमारे ७४ टक्के आहे. कंपन्यांच्या नावाने बनावट संकेतस्थळ बनवण्याच्या प्रमाणातही २०२२ मध्ये १६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत जानेवारी ते मे, २०२३ या कालावधीत बनावट संकेतस्थळ बनवल्याप्रकरणी ५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील केवळ एका प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात एकाला अटक करण्यात आली आहे. ‘फिशिंग’द्वारेही फसवणुकीचे २० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात केवळ चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. याप्रकरणांमध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.