लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : क्रीप्टो करन्सीमध्ये (कूट चलन) गुंतवणुकीच्या नावाने ५२ वर्षीय शेअर ट्रेडरची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीने बँक खात्यातून साडे सहा लाख रुपये काढले. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.
तक्रारदार खार येथे राहत असून शेअर ट्रेडिंगचे काम करतो. १९ जानेवारीला त्यांना व्हॉटस अँप क्रमांकावरुन नोकरीविषयी विचारणा केली होती. सोनाली अहुजा असे नाव सांगणार्या या महिलेने आपण ईबेमधून बोलत असल्याचे सांगितले. नंतर एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामिल करुन तक्रारदाराला युट्यूब चॅनेलच्या एका चित्रफीतीला लाईक करण्यास सांगितले. चित्रफीत लाईक केल्यानंतर काही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा झाली. त्याद्वारे आरोपींनी तक्रारादाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोबाइलवरुन त्याना किप्टो करन्सीची एक लिंक पाठविण्यात आली होती. त्यात युजर नेम आणि पासवर्ड तयार करण्यास आणि नंतर गुंतवणुक करण्यास सांगण्यात आले. या गुंतवणुकीवर त्यांना हमखास चांगला परतावा मिळेल, असे साक्षी नावाच्या एका महिलेने त्यांना सांगितले.
आणखी वाचा-जागावाटपात रस्सीखेच; अंतिम निर्णय ३ फेब्रुवारीला दिल्लीत अपेक्षित
त्यानंतर तक्रारदाराने स्वतःचे आभासी खाते उघडून सहा दिवसांत सहा लाख ४० हजार रुपये जमा केले. या गुंतवणुकीवर चांगला परताता मिळत असल्याने तक्रारदाराच्या खात्यावर दिसत होते. मात्र त्यांना या खात्यातून पैसे हस्तांतर करता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी साक्षीबरोबर संपर्क साधला असता तिने वाद घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्याने याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक, तोतयागिरी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारदारांनी जमा केलेली रक्कम नागपूर व जयपूर येथील बँक खात्यांवर वर्ग झाली आहे. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.