मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बोरिवली येथील एका डॉक्टरसह तिघांविरोधात कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रवेशाचे आमिष दाखवून तक्रारदारासह आणखी एका व्यक्तीकडून पैसे घेण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बोरिवली (पश्चिम) परिसरात वास्तव्यास असलेले तक्रारदार धर्मांग डेडिया (५४) यांचे याच विभागात दुकान आहे. डेडिया यांची मुलगी दिया हिने २०२२-२३ शैक्षणिक वर्षात वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ प्रवेश परीक्षा दिली होती. त्यांचे मित्र जीमी देसाई यांचा मुलगा मल्हारनेही त्याच वेळी प्रवेश परीक्षा दिली होती. डिडिया यांच्या मुलीने आपण प्रवेश परीक्षा देत असल्याचे आणि केईएम आपल्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय असल्याचे येथील एका डॉक्टरला सांगितले होते. आरोपी डॉक्टरने डेडिया यांना व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळू शकतो, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरने डेडिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. एका महिलेमार्फत ५ टक्के कोट्यातून मुलीला प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन डॉक्टरने डेडिया यांना दिले. यावेळी डेडिया यांनी देसाई यांनाही याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित डॉक्टरशी ओळखही करून दिली.
देसाई यांचा मुलगा मल्हारलाही प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन डॉक्टरने दिले. त्यानंतर १२ मार्च, २०२३ रोजी संबंधित महिला डेडिया व देसाई यांना भेटली. जीवन नावाच्या व्यक्तीमार्फत आपण प्रवेश मिळवून देणार आहोत. यापूर्वी त्याने अशा प्रकारे प्रवेश मिळवून दिले असून प्रवेश मिळवून देण्यासाठी ६२ लाख रुपये भरावे लागतील, असे तिने सांगितले. प्रवेश मिळाला नाही, तर पैसे परत करण्याचे आश्वासन संबंधित डॉक्टरने दिले. त्यानुसार डेडिया व देसाई यांनी प्रत्येकी ५७ लाख रुपये असे एकूण एक कोटी १५ लाख रुपये संबंधित डॉक्टरला दिली. त्यानंतर जून महिन्यात प्रवेश परीक्षेचा निकाल लागला. मात्र त्यानंतरही दोन्ही मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित डॉक्टरकडे पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे डेडिया यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पोलीस अधित कपास करीत आहेत.