मुंबई : येनकेन प्रकारे सायबर फसवणुकीला बळी पाडण्यासाठी आता भामट्यांनी केंद्रीय गुप्तचर विभागाचे (सीबीआय) संचालक प्रवीण सूद यांच्या नावाचा गैरवापर करत मेल पाठविण्यास सुरवात केली आहे. या मेलला उत्तर देणाऱ्या अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. अशा पद्धतीने कुठलाही मेल पाठवला जात नाही, असे ‘सीबीआय’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सायबर फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.
काय मेसेज असतो?
‘लहान मुलांच्या पॉर्नोग्राफी साइट पाहताना तुमचा आयपी ॲड्रेस आढळला आहे. याबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचा (अगदी चिनी बनावटीचा) मोबाइल फोन वापरत असलात तरी आपण पाहात असलेल्या साइटवर नजर ठेवून त्याची नोंद करण्याची अत्याधुनिक यंत्रणा तपास यंत्रणांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे…
आपला आयपी ॲड्रेस आढळल्याने याबाबत तात्काळ स्पष्टीकरण सोबत दिलेल्या मेलवर द्यावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. या कारवाईमध्ये बालकांचे लैंगिक शोषण याबाबत असलेल्या पॅास्को कायद्यानुसार अटक करता येऊ शकते’.. आदी या मेलमध्ये नमूद आहे. या मेलवर संपर्क साधल्यानंतर मात्र संबंधित व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकते.
असे मेल आता अनेकांना येऊ लागले आहेत. अशा मेलमुळे आपली १५ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार केरळातील एका कारखानदाराने दाखल केली. या प्रकरणी सीबीआयने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
सीबीआयचे स्पष्टीकरण
सूद यांच्या नावाचा वापर करून मेल पाठविण्याची हिंमत आता या सायबर गुन्हेगारांमध्ये बळावली आहे. मात्र हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. मुळात सीबीआय संचालक कुठल्याही गुन्हेगाराला स्वत: मेल पाठवत नाहीत. जो कोणी तपास अधिकारी असेल तो याबाबत पत्रव्यवहार करीत असतो. तरीही अशा फसवणुकीला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डिजिटल अटक अशी पद्धत मुळात अस्तित्वातच नाही. त्यामुळे लोकांनी अशा मेल वा फोनला बळी पडू नये. अशा प्रकारचा मेल आलाच तर याबाबत राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंद पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहनही सीबीआयने केले.
सायबर विभागही सावध
अशा पद्धतीने मेल पाठवून पैसे उकळल्याच्या तक्रारी महाराष्ट्र सायबर विभागाकडेही दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडेही अशा प्रकारच्या तक्रारी आल्याचे सांगण्यात आले.
© The Indian Express (P) Ltd