झाडाझडतीसाठीची यंत्रणा अपुरी असल्याने गुन्हेगार मोकाट

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची झाडाझडती घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांच्या हाती अपुरी सामग्री असल्याने सोन्यासह अमली पदार्थाच्या तस्कर टोळ्यांचे फावत आहे. विमानतळासाठी बॉडी स्कॅनर यंत्र आवश्यक असल्याचे सांगत सीमा शुल्क विभागाने गेल्या तीन वर्षांपासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालवला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भारतातून परदेशात निघालेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी प्रस्थान (डिपार्चर) विभागात बॉडी स्कॅनर यंत्रणा आहे.

गेल्या सहा महिन्यांत मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाया पाहता विमानतळावर उतरणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांची झाडाझडती कुचकामी ठरत असल्याचे  स्पष्ट होत आहे. सहा महिन्यांत पथकाने तीन कारवाया करून आफ्रिकन वंशाच्या तरुणांकडून १५ कोटी रुपयांचे दोन किलो उच्च प्रतीचे कोकेन हस्तगत केले. दोन प्रकरणांमध्ये भारतात आलेले कोकेन आफ्रिकन वंशाच्या तरुणांनी पोटातून आणल्याचे उघड झाले. यापैकी दोघे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आणि सीमा शुल्क विभागाच्या झाडाझडतीतून सहीसलामत बाहेर पडले. या कारवायांची दखल घेत सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) जास्त खबरदारी घेणे सुरू केले.

जगाच्या कानाकोपऱ्यातून मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांच्या ‘प्रोफाईल’वरून म्हणजे त्याची पाश्र्वभूमी, कोणत्या देशातून प्रवास सुरू केला, अलीकडच्या काळात सातत्याने प्रवास केला आहे का, आदी बाबी लक्षात घेऊन संशयास्पद प्रवासी बाजूला काढले जातात किंवा नेमकी माहिती (स्पेसिफिक इनपूट) हाती लागल्यावर झाडाझडती घेतली जाते. केवळ याच आधारे विमानतळावर सोने किंवा अमली पदार्थ घेऊन उतरणारे प्रवासी पकडले जातात. त्यामुळे अनेकदा सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून विमानतळाबाहेर पडणे सोपे होते. अलीकडेच नेमक्या माहितीआधारे विमानतळावर परदेशी महिलेची झाडाझडती घेण्यात आली. तिच्या सामानात अमली पदार्थ आढळले नाहीत. म्हणून तिचा एक्स-रे काढण्यात आला, तेव्हा तिच्या पोटात कोकेन दडवलेल्या कॅप्सूल आढळल्या. तसेच शरीराच्या गुप्त भागातही या महिलेने २० ग्रॅम कोकेन दडवल्याचे स्पष्ट झाले.

विमानतळावर उतरलेल्या कोणाचाही एक्स-रे काढता येत नाही. त्यासाठी दंडाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असते. संशयित परदेशी असल्यास आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांबाबतचे नियम जाचक ठरतात. त्यात सुरक्षा यंत्रणांना हुलकावणी देण्यासाठी निरनिराळ्या मार्गानी अमली पदार्थ आणले जातात. अशा वेळी केवळ संशयदृष्टीवर विसंबून राहणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या विमानतळावर तपासणीसाठी उपलब्ध असलेल्या उपकरणांद्वारे शरीरात किंवा वस्त्रांमध्ये दडवलेल्या वस्तूंचा अंदाज घेता येत नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी सीमा शुल्क विभागाने बॉडी स्कॅनर यंत्र पुरवण्याची मागणी केली होती. मात्र सुमारे एक कोटी रुपयांची ही यंत्रणा पुरवण्याबाबत केंद्र सरकार गंभीर नसल्याची प्रतिक्रिया सीमा शुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Story img Loader