मुंबई : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये मोफत रक्त तपासणीसाठी नियुक्त कंत्राटदाराबरोबर केलेला करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे कंत्राटदाराने ‘आपला दवाखाना’मध्ये मोफत रक्त तपासणी सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, ‘आपला दवाखाना’मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेकडून कंत्राटदाराची आठ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत.

सर्वसामान्य मुंबईकरांना घराजवळ उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ‘आपला दवाखाना’ सुरू केले. सध्या मुंबईत २४३ ‘आपला दवाखाना’ कार्यरत असून या दवाखान्यात दररोज २५ हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. ‘आपला दवाखाना’मध्ये औषधांसोबतच १४७ प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत केल्या जातात. मुंबई महानगरपालिकेने रक्त तपासण्या करण्याचे कंत्राट क्रस्ना डायग्नोस्टिक या कंपनीला दिले होते. क्रस्ना डायग्नोस्टिक आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या करारानुसार २७.५२ कोटी रुपयांच्या चाचण्या करायच्या होत्या. या चाचण्या नोव्हेंबर २०२४ मध्येच पूर्ण झाल्या. चाचण्यांसदर्भातील सर्व माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. महानगरपालिकेने चाचण्या करण्यासंदर्भात १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदतही संपुष्टात आल्यामुळे रक्त चाचण्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या सेवेची सुमारे आठ कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचे क्रस्ना डायग्नोस्टिककडून सांगण्यात आले. ही सेवा बंद झाल्याने ‘आपला दवाखाना’मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना विविध चाचण्यांसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

हेही वाचा – महिला पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन, बदलापूर प्रकरणी राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

आपली चिकित्सा सेवाही बंद

मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने, प्रसूतीगृह आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या विविध प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यासाठी ‘आपली चिकित्सा’ उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार ५० रुपयांमध्ये १३७ विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जात होत्या. यासाठीही क्रस्ना डायग्नोस्टिक या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता ही सेवाही बंद करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने, प्रसूतीगृह आणि रुग्णालयांमध्ये दररोज चार हजारापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असतात.

हेही वाचा – कमिशनवर घेऊन विमानतळ कर्मचाऱ्यांची तस्करांना मदत, तीन कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक

सेवा बंद असल्याने रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मधुमेह, टीबी, मलेरिया, डेंग्यू आदी महत्त्वाच्या चाचण्यांसाठी महापालिकेकडे आधीच सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. – डॉ. दक्षा शाह, मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिका

Story img Loader