मुंबई : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ वर्षापर्यंतच्या तब्बल २४ हजार ४४० मुलांवर माेफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यात हृदय शस्त्रक्रिया, दुभंगलेल्या ओठांची अणि टाळूची शस्त्रक्रिया, जन्मत: मोतीबिंदू अशा जवळपास १०४ प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. लहान मुलांच्या नियमित तपासणीद्वारे वेळेत योग्य निदान करून तातडीने या शस्त्रक्रिया केल्याने अनेक मुलांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास २ कोटींपेक्षा अधिक मुले आहेत. त्या मुलांची नियमित तपासणी करून त्यांच्यात आढळणारे जन्मत: असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य उपचार राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीस्तरावर ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून २ वेळा तर शासकीय व निमशासकीय शाळेतील ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत आरोग्य तपासणी करण्यात येते. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १ लाख ६१ हजार २१६ अंगणवाड्यांमधील ९८ लाख ७ हजार ८४० बालकांची माेफत तपासणी करण्यात आली. ही तपासणी दोन टप्प्यात करण्यात आली. त्याचप्रमाणे एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ७० हजार ६८० इतक्या शाळांमधील ९८ लाख ७९ हजार ४२ इतक्या मुलांची मोफत तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील जन्मत: आजार आढळलेल्या २४ हजार ४४० मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात २ हजार १६४ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचप्रमाणे २२ हजार २७६ बालकांवर अन्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात दुभंगलेल्या ओठांची अणि टाळूची शस्त्रक्रिया, जन्मत: मोतीबिंदू यांसारख्या अन्य लहान शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

हेही वाचा – मुंबई : कांजुरमार्ग येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा खून, मेट्रो कारशेड परिसरात सापडला होता मृतदेह

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या १०४ शस्त्रक्रियांपैकी ५२ शस्त्रक्रियांचा समावेश महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेत होतो. उर्वरित ५२ शस्त्रक्रियांमध्ये ३१ प्रकारच्या दातांच्या विकारांचा समावेश आहे. या शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत अंगीकृत असलेल्या राज्यातील १५ जिल्ह्यातील ६० हून अधिक रुग्णालयांमध्ये मोफत करण्यात येतात. अंगणवाडी सेविका, आशा किवा आरोग्यसेविका तसेच जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते.

हेही वाचा – आरोपीला सैफच्या घरी नेऊन तपास

११९६ पथके

राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकूण ११९६ पथके मंजूर करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात १ वाहन, २ वैद्यकीय अधिकारी, १ औषधी निर्माण अधिकारी, १ एएनएम, तपासणी साहित्य पुरविण्यात आले आहे. ही पथके प्रत्येक तालुक्यात नियुक्त केली असून, ग्रामीण रुग्णालये किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पथके नियुक्त आहेत. प्रत्येक पथकास ठराविक वेळापत्रकाप्रमाणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free surgery on 24 thousand children in a year campaign under national child health programme mumbai print news ssb