मुंबई : जागतिक स्वर दिनानिमित्त अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात शनिवार, १६ एप्रिल रोजी विनामूल्य स्वर तपासणी करण्यात येणार आहे. स्वरयंत्र आणि स्वरनलिकेविषयक आरोग्य समस्या भेडसावत असलेल्या नागरिकांसाठी १८ ते २३ एप्रिल या काळात सवलतीच्या दरात स्वर तपासणी, उपचार आणि आवश्यकता असल्यास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
सेव्हन हिल्स रुग्णालयात आरोग्यवर्धिनी केंद्र पालिकेने सुरू केले आहे. मागील दोन वर्षांत करोनाची बाधा झालेल्या रुग्णांना करोनापश्चात आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. या रुग्णांना आवश्यक आरोग्य तपासण्या सवलतीच्या दरात करून घेण्यासाठी एकाच छताखाली सर्व सुविधा या केंद्राच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. करोनामुक्त झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये स्वरनलिका आणि स्वरयंत्र यामध्ये आरोग्य समस्या जाणवत आहेत. बोलताना, उच्चारताना अडथळे येत आहेत. या रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यासाठी रुग्णालयातील नाक, कान, घसा बाह्य उपचार विभागात शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विनामूल्य स्वर तपासणी केली जाणार आहे. रुग्णालयातील सभागृहात शनिवारी दुपारी १२ ते १ या वेळेत ‘मेरी आवाज ही पहचान हैं’ या कार्यक्रमअंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. चांगल्या आवाजासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत स्वर उपचारतज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
१८ ते २३ एप्रिल स्वर उपचार सप्ताह
स्वरविषयक तपासणी करून घेता यावी, योग्य उपचार मिळावेत आणि गरज असेल तर शस्त्रक्रियादेखील करता यावी, या सर्व आरोग्य सुविधा सवलतीच्या दरात मिळाव्यात, यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात १८ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत स्वर उपचार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संबंधित रुग्ण उपचारासाठी येऊ शकतात, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

Story img Loader