औरंगाबाद व नागपूर येथील वीजहानी नियंत्रण आणि वसुली वाढवण्यासाठी ‘महावितरण’ने फ्रँचायजी कंपन्या नेमल्या खऱ्या पण या दोन्ही ठिकाणच्या कंपन्यांकडे असलेली ‘महावितरण’ची थकबाकी कायम असून एकूण सुमारे २०० कोटी रुपये फ्रँचायजी कंपन्यांकडे थकले आहेत.
वीजचोरी जास्त आणि वीजदेयक वसुली कमी अशा ठिकाणी वीजवितरणासाठी फ्रँचायजी नेमण्याच्या धोरणानुसार प्रथम भिवंडीत वीजवितरणासाठी फ्रँचायजी कंपनी नेमण्यात आली. ‘टोरंट पॉवर’ला हे काम मिळाले. तो प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाल्यानंतर ‘महावितरण’ मागच्या वर्षी औरंगाबाद, नागपूर आणि जळगाव येथे वीजवितरणासाठी फ्रँचायजी नेमले. औरंगाबादमध्ये ‘जीटीएल’, नागपूरमध्ये स्पॅन्को तर जळगावमध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्हजला फ्रँचायजी म्हणून नेमण्यात आले. पण औरंगाबाद व नागपूरमध्ये सुरुवातीपासूनच फ्रँचायजीकरणानंतर गोंधळ झाला. त्यातून महाराष्ट्र राज्य वीजग्राहक यंत्रणेने या दोन्ही ठिकाणच्या फ्रँचायजींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा प्रश्न वीज आयोगासमोर नेला होता. त्यावेळी दोन्ही कंपन्यांनी मिळून ‘महावितरण’चे सुमारे ४२० कोटी रुपये थकवले होते. नंतर त्यांनी थोडे पैसे दिले. पण अद्यापही औरंगाबाद व नागपूरच्या फ्रँचायजींकडून थकलेल्या पैशांचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. ‘जीटीएल’कडील थकबाकी २४० कोटी रुपयांपर्यंत गेली होती व त्यांनी काही पैसे भरल्याने ती १२७ कोटींवर आली आहे. तर ‘स्पॅन्को’कडील थकबाकी २५० कोटी रुपयांपर्यंत गेली होती. ती आता ८५ कोटी रुपयांपर्यंत आली आहे. तरीही या दोन्ही कंपन्यांकडे मिळून ‘महावितरण’चे २१२ कोटी रुपये थकले आहेत.
याबाबत विचारणा केली असता, ‘जीटीएल’च्या थकबाकीबाबत काही वाद आहेत. त्यामुळे हिशेबाच्या तपासणीसाठी स्वतंत्र लेखापरीक्षक नेमण्यात आला. त्यांचा अहवाल पाहून पुढील कार्यवाही केली जाईल. तर ‘स्पॅन्को’ने आता ‘एस्सल’ या कंपनीशी करार केला असल्याने त्यांच्याकडून ८५ कोटी रुपये कशारितीने देणार याचे वेळापत्रक त्यांनी दिले आहे. १८ टक्के व्याजासह थकलेल्या पैशांची वसुली केली जाईल, असे ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता
यांनी सांगितले.