लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये वारंवार होणारे बिघाड, प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे बंद पडणारी वातानुकूलित यंत्रणा, तांत्रिक बिघाडामुळे उघडे राहणारे दरवाजे अशा समस्यांमुळे बेजार झालेल्या प्रवाशांना भविष्यात दिलासा मिळेल, असा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे. यासाठी कृती आराखडा तयार करून या रेल्वेगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सात रेक आहेत. त्यांच्या ९६ फेऱ्या होतात. मात्र, अनेकदा वातानुकूलित रेल्वेगाड्यांमध्ये तांत्रिक बिघाडांची मालिका सुरू झाली होती. या गाड्यांमध्ये थंड हवा येणे बंद होणे, डब्यांचे दरवाजे बंद न होणे अशा घटना घडत होत्या. त्यामुळे अधिकचे पैसे मोजून वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या होत्या.

आणखी वाचा-गॅस्ट्रो, हिवतापाने मुंबईकर हैराण, जूनमध्ये साथीच्या आजारांचे १,३९५ रुग्ण

त्यामुळे या समस्या सोडविसाठी मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सेंट्रल, कांदिवली आणि विरार येथील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यानंतर त्यातील बिघाड दूर करण्यासाठी कृती आराखडा आखला. प्रत्येक समस्येचे कारण शोधणे, त्याचे विश्लेषण करून, त्या समस्यांचा कायमस्वरूपी उपाय शोधून काम करण्यात आले. तसेच रेकची वारंवार तपासणी आणि देखभाल-दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आता रेल्वेगाड्यांतील समस्या दूर झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

वातानुकूलित रेल्वेगाडीला मोठी पसंती आहे. वातानुकूलित रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. मात्र, काही वेळा वातानुकूलित रेल्वेगाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड होत होता. यावर तोडगा काढण्यात आला असून आता बिघाड कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे वातानुकूलित रेल्वेगाड्यांतील ९५ टक्क्यांहून अधिक बिघाड दूर झाला आहे. -विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे