मुंबई : मुलीचे मुलाशी मैत्रीचे संबंध आहेत याचा अर्थ मुलाने तिची शारीरिक संबंध ठेवण्यास संमती आहे, हे समजू नये. किंबहुना अशी मैत्री मुलाला मुलीवर बळजबरी करण्याचा परवाना देत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यासोबतच न्यायालयाने लग्नाचे आमिष दाखवून तरूणीला गर्भवती करणाऱ्याला अटकपूर्व जामीन नाकारला आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी उपरोक्त मत नोंदवून त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
हेही वाचा >>> केतकी चितळेला दिलासा; २१ गुन्ह्यात अटक न करण्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही
तरूणीच्या तक्रारीनुसार, तिचे आरोपीशी मैत्रीचे संबंध होते. परंतु लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर बळजबरी केली. ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तर तक्रारदार तरूणीच्या संमतीनेच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा आरोपीने अटकपूर्व जामिनाची मागणी करताना केला होता.
हेही वाचा >>> सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला दिलासा दिल्यानंतर आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांसमोर; म्हणाले “डोळ्यात डोळे घालून जेव्हा…”
न्यायालयाने मात्र आरोपीचा दावा फेटाळला. तसेच मुलीचे मुलाशी मैत्रीचे संबंध आहेत याचा अर्थ मुलाने तिची शारीरिक संबंध ठेवण्यास संमती आहे हे समजू नये, असे स्पष्ट केले. शिवाय शारीरिक संबंधांना तक्रारदार तरूणीने संमती देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला होता की नाही? हे तपासण्यासाठी आरोपीच्या कोठडी चौकशीची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने म्हटले व आरोपीची याचिका फेटाळली.