१९ व्या कलर्स स्क्रीन पुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली ती एका शानदार नृत्याने..निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सूत्रसंचालनाला खुमासदार सुरुवात केली आणि नंतर शाहरूख खानही सूत्रसंचालन करण्यासाठी व्यासपीठावर अवतरला तेव्हा प्रेक्षकांमधून पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचे स्वागत केले. शाहरूखने गाणी गुणगुणायला सुरुवात केली मंचाच्या मागून मिका सिंग अवतरला. मग ‘पुंगी बजाके’ या गाण्यावर दोघांनी ताल धरला आणि प्रेक्षकही त्या तालावार डोलू लागले. शाहरूखने दीपिका पदुकोणला मंचावर बोलावले आणि तिची उंची यावरून त्याने थट्टा मस्करी करून धमाल आणली. स्टुडण्ट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर चमकलेले आलिया भट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आदींनी पहिल्यांदाच मंचावरती नृत्य सादर केले. त्यानंतर मंचावर अवतरलेल्या प्रियांका चोप्राने गेल्या वर्षभरातील बॉलीवूडपटांच्या संकल्पनेवर नृत्य सादर करून अनोखा नृत्याविष्काराचा आनंद रसिकांना दिला.

अमिताभ बच्चन यांचा गौरव
सिनेमाच्या शतकानिमित्त अतुलनीय योगदानाबद्दल बॉलीवूड शहनशहा अर्थात अमिताभ बच्चनला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाहरूख, रितेश देशमुख, शबाना आणि विद्या बालन अशा चौघांच्या हस्ते बिग बीचा गौरव करण्यात आला. तर मानाचा आणि प्रतिष्ठेचा असा रामनाथ गोएंका एडिटर्स चॉईस पुरस्कारावर ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटाने मोहोर उमटवली.

प्रिया बापट सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्री
प्रिया बापट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘काकस्पर्श’ चित्रपटासाठी देण्यात आला. तर ‘तुकाराम’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकाविला. ‘खेळ मांडला’ चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा अभनेता मंगेश देसाई सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मानकरी ठरला.

विविध गटांत जिंकलेल्या कलावंतांची यादी
सर्वोत्कृष्ट संगीत: प्रीतम (बर्फी)
सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट : श्याम कौशल (गँग्स ऑफ वासेपुर)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपट : नितीश टाकिया क्रेयॉन पिक्चर्स (दिल्ली सफारी)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : अभिषेक बच्चन (बोलबच्चन) आणि अनु कपूर (विकी डोनर)
सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका : तिग्मांशू धुलिया (गँग्स ऑफ वासेपुर)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : अनाईता श्रॉफ
अदजानिया (कॉकटेल)
सर्वोत्कृष्ट पात्रयोजनेचा चित्रपट : गँग्स ऑफ वासेपुर.
सर्वोत्कृष्ट ध्वनी : संजय मौर्य व ऑल्विन रेगो (कहानी)
सर्वोत्कृष्ट छायालेखक : रवी वर्मन (बर्फी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : मोहम्मद समाद (गट्टू)
सर्वोत्कृष्ट संकलक : नम्रता (कहानी)
सर्वोत्कृष्ट गीतकार : जावेद अख्तर (तलाश)
सर्वोत्कृष्ट पाश्र्वगायिका : शाल्मली खोलगडे (इशकजादे)
सर्वोत्कृष्ट पाश्र्वगायक : जावेद अली (इशकजादे)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : डॉली अहलुवालिया (विकी डोनर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : नवाझुद्दिन सिद्दिकी (तलाश)