नोकरीची चौकशी करण्यासाठी मुंबई विमानतळावर एका तरुणाने केलेल्या फोन कॉलमुळे एकच गोंधळ उडाला. फोन कॉल दरम्यान शब्द चुकीचा ऐकल्याने विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली तसेच बॉम्ब शोधक पथकही तयार करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. ‘बॉम्बे एअरपोर्ट है?’ या वाक्याऐवजी विमानतळावरील अधिकाऱ्याने ‘बॉम्ब है एअरपोर्ट पे’ असे ऐकल्याने हा गोंधळ झाल्याचे चौकशीअंती उघडकीस आले.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थ्याने मुंबई विमानतळावर फोन केला. गुगलवर मुंबई विमानतळावरील व्यवस्थापन कक्षाचा क्रमांक शोधून या मुलाने नोकरीसंदर्भात कॉल केला. फोन ठेवता या मुलाने फोन मुंबई विमानतळावरच लागला आहे ना हे अधिकाऱ्याला विचारण्यासाठी ‘बॉम्बे एअरपोर्ट है?’ असा प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नऐवजी अधिकाऱ्याने ‘बॉम्ब है एअरपोर्ट पे’ असे ऐकले. या अधिकाऱ्याने पुन्हा ज्या क्रमांकावरुन फोन आलेल्या त्या मुलाला फोन करुन यासंदर्भात विचारले असता ऐकण्यात चूक झाल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले. तरी सुरक्षेसंदर्भात तडजोड नको म्हणून नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षकांना सतर्कतेचा इशारा दिला. हा सर्व प्रकार १९ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार दोन तासांच्या तपासणीनंतर हा कॉल ‘सामन्य’ कॉल असल्याचे निष्पन्न झाले. कॉल करणाऱ्याला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी समज दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
‘मी याआधी काही हॉटेल्समध्ये काम केले आहे. मात्र मागील पाच महिन्यांपासून मी नोकरीच्या शोधात आहे. मी जिथे जिथे नोकरीची संधी आहे तिथे कॉल करुन चौकशी करत आहे. मला एकाने मुंबई विमानतळावर नोकरीची संधी असल्याची माहिती दिली. त्याचसंदर्भात चौकशीसाठी मी विमानतळावर फोन केला होता. माझा इतर कोणताही हेतू नव्हता. झालेला गोंधळ समजल्यानंतर मी लगेच विमानतळ अधिकाऱ्यांची माफी मागितली,’ असं या तरुणाने ‘एचटी’शी बोलताना सांगितले.