मुंबई : मुंबईत मोटार वाहनचालक व सहप्रवासी यांनी सिटबेल्ट लावणे १ नोव्हेंबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी आदेश जारी केले. त्यानुसार वाहनांमध्ये सीटबेल्ट बसवून घेण्यासाठी वाहतूक पोलिसांनी १ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील वा मागील आसनावर बसलेल्या सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट लावला नसेल, तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९च्या कलम १९४ (ब) (१) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालविल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सहप्रवाशांनाही सुरक्ष बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा नसलेल्या मोटार वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करण्यासाठी १ नोव्हेबर,२०२२ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांनी सुरक्षा बेल्ट लावला नव्हता, अशी बाब तपासात निष्पन्न झाली होती. मुंबईतील रस्ते अपघातांचा अभ्यास करून वाहतूक पोलीस मुंबईत विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाच हा भाग आहे.

मुंबईतील रस्ते अपघातांची स्थिती

मुंबईत २०२२ मध्ये पहिल्या सहा महिन्यांत झालेल्या प्राणघातक अपघातांमध्ये घट झाली आहे. यावर्षी जूनपर्यंत १५४ अपघातांमध्ये १५६ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये मुंबईत ४२० प्राणघातक अपघातांमध्ये ४४७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. कोरोनाकाळात वाहतुकीवर निर्बंध असल्यामुळे मुंबईत २०२० व २०२१ मध्ये प्राणघातक अपघातांमध्ये घट झाली होती. २०२१ मध्ये मुंबईत ३७६ अपघातांमध्ये ३८७ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, २०२० मध्ये ३४९ नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला होता. तसेच २०१७ व २०१८ मध्ये अनुक्रमे एकूण ४९० व ४७५ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.

राज्यातील रस्ते अपघात

राज्यात यावर्षी जून अखेरपर्यंत महाराष्ट्रातील रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढून आठ हजार ०६८ वर पोहोचली आहे. २०१९ मध्ये याच कालावधीत सात हजार ०६९ लोकांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये जूनपर्यंत सुमारे सहा हजार ८३७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही वर्षांत राज्यात रस्ते अपघातांमध्ये मृत्युच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१९ मध्ये अपघातांमध्ये सुमारे १२ हजार ७८८ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर २०२१ मध्ये रस्ते अपघातात मृतांची संख्या १३ हजार ५२८ होती. २०१८ मध्ये सुमारे १३ हजार २६१ नागरिकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From november 1 seatbelts mandatory driver along co passengers orders issued by traffic police mumbai print news ysh