मुंबई : १ ऑगस्टपासून सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर पावणेपाच मीटरहून अधिक उंच लाटा उसळणार आहेत. तर या पावसाळ्यातील समुद्राला सर्वात मोठी भरती गुरूवारी आणि शुक्रवारी येणार आहे. यादरम्यान पाऊस पडल्यास मुंबईकरांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने येत्या पावसाळ्यातील भरती – ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले असून ऑगस्ट महिन्यात समुद्राला आठ दिवस मोठी भरती येणार आहे. त्यापैकी सहा दिवस पुढील आठवड्यात येणार आहेत. मंगळवार, १ ऑगस्ट ते रविवार ६ ऑगस्ट दरम्यान रोज मोठी भरती येणार आहे.
चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना पावणेपाच मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळल्या आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्याउलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे सखलभागात पाणी साचते.
या दिवशी येणार मोठी भरती
दिवस | वेळ | लाटांची उंची |
मंगळवार १ ऑगस्ट | सकाळी ११.४६ | ४.५८मीटर |
बुधवार २ ऑगस्ट | दुपारी १२.३० | ४.७६ मीटर |
गुरुवार ३ ऑगस्ट | दुपारी १.१४ | ४.८७ मीटर |
शुक्रवार ४ऑगस्ट | दुपारी १.५६ | ४.८७ मीटर |
शनिवार ५ ऑगस्ट | दुपारी २.३८ | ४.७६ मीटर |
रविवार ६ ऑगस्ट | दुपारी ३.२० | ४.५१ मीटर |