राज्यात सातत्याने घडणाऱ्या जातीय अत्याचाराला पायबंद घालण्यास अपयशी ठरलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, फुले-आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येऊन येत्या २२ जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. त्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने पुढाकार घेतला आहे.
राज्यात अनेक जिल्ह्य़ांत विशेषत: अहमदनगर जिल्ह्य़ात जातीय अत्याचाराच्या सातत्याने घटना घडत आहेत. अलीकडील काही घटनांच्या निषेधार्थ शिर्डी येथे रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी व आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढला होता. मात्र त्याला विरोध म्हणून प्रतिमोर्चाही काढण्यात
आला. जातीय अत्याचार रोखण्यात भाजप-शिवेसना युती सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्याचा निषेध म्हणून आणि जातीयवादी शक्तींना आव्हान देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, आंबेडकरवादी संघटना यांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संदर्भात दोन बैठका झाल्या आहेत. उद्या रविवारी आणखी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व समविचारी संघटनांना एकत्र करून विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात २२ जुलै रोजी सरकारच्या विरोधात धिक्कार मोर्चा काढण्यात येणार आहे, असे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांनी सांगितले.

Story img Loader