मुंबई : मंत्रालय प्रवेशासाठी अद्यावत ‘फेशियल रेकाग्निशन सिस्टिम’ (चेहरा ओळख आधारित उपस्थिती प्रणाली – एफआरएस) व रेडिओ फ्रीक्वेंसी आईडेंटिफिकेशन (आरएफआयडी) यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत १०,५०० कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ‘एफआरएस’ नोंद झाली असून त्यांचा प्रवेश या नवीन तंत्रज्ञानाने होत असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्य प्रवेशद्वारातून ५० ते ६० कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन ही यंत्रणा धाब्यावर बसवली.
मंत्रालयातील अनावश्यक प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एफआरएस’ व ‘आरएफआयडी’ यंत्रणा बसविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरमध्ये दिले आहेत. मंत्रालयात नियमित प्रवेश करणारे मंत्री, आमदार, खासदार, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार, यांची ‘एफआरएस’ नोंद करण्याचे काम गेले दोन महिने सुरू आहे. आतापर्यंत दहा हजार ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. हे अधिकारी व कर्मचारी मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वारांवर बसविण्यात आलेल्या ‘एफआरएस’ यंत्रणेने प्रवेश करीत आहेत. या प्रणालीद्वारे त्यांची चेहरा ओळख नोंद झाल्याने सनदी अधिकारी प्रवेशद्वारावरून उच्च अधिकारी आता सहज प्रवेश करीत आहेत.