फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी भाजपचे सदस्य व दूरचित्रवाणी कलावंत गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधात गेले १३९ दिवस सुरू असलेला संप कोणत्याही तोडग्याविनाच विद्यार्थ्यांनी बुधवारी मागे घेतला. अर्थात उजव्या विचारसरणीच्या घुसखोरीच्या निषेधार्थ चौहान यांच्याविरोधातले आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरूच राहील, असे आंदोलकांनी जाहीर केले आहे. मात्र, ज्या कारणांसाठी हे आंदोलन

केले गेले त्यांचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मातब्बरांना डावलून केवळ एका मालिकेपुरती अभिनेता म्हणून संबंध आलेल्या गजेंद्र चौहान यांच्या हातात ‘एफटीआयआय’चा कारभार कसा दिला जाऊ शकतो हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. ‘एफटीआयआय’च्या दर्जाला अनुसरून अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नेमणूका करा, ही आमची मागणी वावगी कशी ठरू शकते ,असा सवाल सध्या तिथे चित्रपट दिग्दर्शनाचा प्रशिक्षणक्रम पूर्ण करत असलेल्या अमेय गोरे या विद्यार्थ्यांने केला. तर चौहान यांना विरोध हे तात्कालिक कारण आहे. संस्थेच्या कारभारातील घसरत चाललेला दर्जा हे विद्यार्थ्यांच्या रागाचे खरे कारण आहे, असे मत संस्थेशी संबंधित असलेले अभ्यासक व्यक्त करताना दिसतात.
विद्यार्थ्यांकडे सरकारसमोर मांडणी करण्याइतके राजकीय शहाणपण नसल्यानेच हे आंदोलन फसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांचे बिनसले कुठे?
‘एफटीआयआय’सारखी कमीतकमी मूल्यात चित्रपट शिक्षण देणारी सरकारी संस्था आमच्यासारख्या विद्यार्थ्यांंची गरज आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करून आपल्याच पायावर कु ऱ्हाड कोण मारून घेणार?, असा सवाल विद्यार्थी करताना दिसतात. आज संस्थेच्या नावावर चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळी विद्यार्थ्यांसाठी योगदान द्यायला तयार आहेत मात्र उदासीन कारभारामुळे चांगल्या लोकांना संस्थेत आणण्याचे प्रयत्नच केले जात नाहीत. त्याऐवजी कुणीतरी अभ्यागत व्याख्याते आणून कार्यशाळा पूर्ण केल्याचे कागदोपत्री दाखवले की आपली जबाबदारी संपली, असा कारभार केला जातो, अशी तक्रार संजय मोरे ठाकूर या विद्यार्थ्यांने
केली.

आंदोलन मागे घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या निर्णयाचा मला आनंद वाटतो. जीवन हे आव्हानांनी भरले असते आणि हे अध्यक्षपदही माझ्यासाठी आव्हानच आहे. सर्वच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मी ते पेलेन. विद्यार्थ्यांशी चांगले नाते निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल.
– गजेंद्र चौहान

इतर काही आक्षेप
संस्थेत एकच साऊंड स्टुडिओ आहे, एकच कॅ मेरा आहे ज्यावर सगळ्या डिप्लोमा फिल्म्सचे चित्रिकरण केले जाते.
कॅ मेरा एकच, विद्यार्थी बारा, प्रत्येकाला आपली फिल्म पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतात असे गणित धरले तरी केवळ हातात कॅमेरा येण्यासाठीच विद्यार्थ्यांना सहा ते आठ महिने वाट पहावी लागते.
प्रक्रिया पोस्ट प्रॉडक्शनच्याही बाबतीत असल्याने दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांंना चार वर्ष लागतात.

Story img Loader