दिल्लीत ६ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा

‘एफटीआयआय’चे अध्यक्ष गजेंद्र चौहान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेली आत्ताची सोसायटी रद्द करा, ही मागणी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी कायम ठेवल्यामुळे माहिती आणि प्रसारण खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबरची त्यांची दुसरी चर्चेची फेरीही निष्फळ ठरली. मात्र, दोन्ही बाजूंकडून हा प्रश्न सोडवण्यासाठीचे प्रयत्न निकराने सुरू असून आता दिल्लीत पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचे ‘एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशन’च्या वतीने सांगण्यात आले.

‘माहिती आणि प्रसारण मंत्रालया’च्या वतीने संयुक्त सचिव के. संजय मूर्ती, उपसचिव दीपक कुमार आणि ‘फिल्म्स डिव्हिजन’चे संचालक मुकेश शर्मा या अधिकाऱ्यांनी ‘एफटीआयआय’च्या विद्याथ्र्र्याबरोबर गुरुवारी पुन्हा एकदा चर्चा केली. चार तास चाललेल्या या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी गजेंद्र चौहान यांना हटवण्याची आपली मागणी कायम ठेवली. ‘एफटीआयआय’च्या नव्या सोसायटीसाठी सदस्यांची नियुक्ती कशी करावी, याबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे, नियम ही समिती निश्चित करेल. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या नियुक्त करण्यात आलेल्या सोसायटीला कुठलीही कार्यवाही करता येणार नाही किंवा ती समिती पूर्णपणे बरखास्त करावी, या मागणीचा पुनरुच्चार आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी बैठकीत केला. आंदोलनकर्ते विद्यार्थी त्यांच्या मुद्यावर अडून बसले असल्याने चर्चेच्या दुसऱ्या फेरीतही प्रश्न सुटलेला नाही.  आमच्याशी चर्चा करणारे अधिकारी अजूनही आमच्या मागण्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही बाजूंच्या मागण्या, मागण्या पूर्ण करताना येणारे अडथळे असा सगळ्या बाजूंनी विचार केला जातो आहे. जेणेकरून नव्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करता येईल, अशी माहिती असोसिएशनने केली आहे.

Story img Loader