जोगेश्वरी परिसरात एकावर गंभीर हल्ला करून गेल्या ३५ वर्षांपासून गुंगारा देणारा चिंकू बदल प्रसाद ऊर्फ पेटबली यादव याला पकडण्यात अखेर जोगेश्वरी पोलिसांना यश आले आहे. कोणतेही छायाचित्र अथवा महत्त्वपूर्ण माहिती नसताना जोगेश्वरी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला सापळा रचून अटक केली.
जोगेश्वरी परिसरात १९८९ मध्ये एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पेटबलीला अटक झाली होती. त्याप्रकरणी २० दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर आरोपी पेटबली बाहेर आला. त्यानंतर तो न्यायालयापुढे हजरच झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषीत केले. आरोपी केवळ रेतीच्या दुकानात काम करत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. पण त्याचे छायाचित्र पोलिसांकडे उपलब्ध नव्हते. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपी १९९० मध्ये उत्तर प्रदेशातील गावी गेल्याचे पथकाला समजले.
त्यावेळी पोलिसांनी माहिती घेतली असता चिंकू प्रसाद नावाने त्याला कोणी ओळखत नसल्याचे, तसेच त्याचे पोट मोठे असल्यामुळे लहानपणापासूनच तो पेटबली नावाने प्रचलित असल्याचे पोलिसांना समजले. पेटबली नावाच्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली असता अशाच वर्णनाची एक व्यक्ती जोगेश्वरी परिसरातील वेल्डिंगच्या दुकानात कामाला असल्याचे पोलीस पथकाला समजले. पण आरोपी त्यावेळी गावी गेला होता. तो आल्यावर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता आपणच चिंकू प्रसाद असल्याचे त्याने मान्य केले. तसेच गंभीर दुखापतीचा गुन्हा केल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पेटबली उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील तुलसीपूर येथील रहिवासी आहे.