पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असल्या तरी राज्यात दुचाकी, मोटारी आणि अन्य वाहनांची संख्या मात्र वाढतच चालली आहे. स्कूलबसची संख्या वर्षभरात दुपटीहून अधिक वाढली असून हे लक्षणीय आहे. दुचाकींची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल १५ लाखांनी तर मोटारींची संख्या तब्बल तीन लाखांनी वाढली आहे. एकूण वाहनांची संख्या दोन कोटी ८ लाखांवर गेली आहे. गेल्यावर्षी १,८९, १९ हजार वाहनांची नोंद झाली होती.
इंधनाच्या किंमती सातत्याने वाढत असल्या तरी राज्यातील नागरिकांकडून गाडय़ांच्या खरेदीचा सपाटा मात्र सुरूच आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राज्यात ८९६३ स्कूल बस होत्या. वर्षभरात ही संख्या दुप्पटीहून अधिक वाढली असून आता १९१३७ स्कूलबस नोंदल्या गेल्या आहेत. राज्यात गेल्यावर्षी १,३५,१३,५८२ दुचाक्या होत्या. ही संख्या आता १,४९,२८,५६६ वर गेली असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. मोटारगाडय़ांची संख्या २६ लाख ५९ हजारावरून २९ लाख ५६ हजारांवर गेली आहे. दर लाख लोकसंख्येमागे १८०१४ वाहने आहेत.
विमा पॉलिसी घटल्या
लोकांचे जीवन अस्थिर, असुरक्षित व धकाधकीचे होत असताना जीवन विमा पॉलिसी काढणाऱ्यांची संख्या राज्यात घटत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. राज्यात २०१०-११ मध्ये नवीन आयुष्य विमा काढणाऱ्यांची संख्या ५६ लाख २८ हजार होती. त्यांच्या प्रीमियमची रक्कम १२५७१ कोटी रुपये होती. मात्र ही संख्या २०११-१२ मध्ये घटली असून या वर्षांत ५१ लाख ६८ हजार पॉलिसींची विक्री झाली. तर त्यापोटी १०७४० कोटी रुपये प्रीमियम जमा झाला. जीवन विमा निगमव्यतिरिक्त २३ खासगी विमा संस्था कार्यरत असताना पॉलिसी घेणाऱ्यांची संख्या मात्र घटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा