मुंबई: मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी चौकशीसाठी बोलावले असून, चौकशी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. ईडीने चौकशीसाठी पाचारण केल्यामुळे चहल हे चर्चेत असतानाच रविवारी त्यांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
करोना साथीच्या काळात आरोग्य सेवा पुरवताना मुंबई महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांची आधीच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी सुरू आहे. त्यातच सक्तवसुली संचालनालयानेही आयुक्तांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. चौकशीची टांगती तलवार असताना चहल यांनी रविवारी मुंबईत पार पडलेल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.
ईडी चौकशीबद्दल पालिका आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले की, शो हॅज टू गो ऑन. सोमवारी ईडी कार्यालयात जाणार असून त्यांना योग्य ते सहकार्य करू. याबाबत आणखी माहिती विचारली असता आज केवळ मॅरेथॉनवरच बोलणार असल्याचे स्पष्ट केले.