मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती आता सुधारली असून, सतत पाळण्यात येणारे बंद किंवा दगडफेकीचे प्रकार पूर्णपणे थांबल्याचा दावा जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी केला. राज्यात विधानसभेच्या निवडणुका कधीही होऊ शकतात व त्यानंतरच पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई भेटीवर आलेल्या सिन्हा यांनी काही निवडक पत्रकारांशी संवाद साधताना ३७० कलम रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे सुधारल्याचा दावा केला. या वेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि राज्य भाजपचे प्रवक्ते सुजय पत्की उपस्थित होते. पूर्वी सीमेपलीकडून काश्मीर खोऱ्यात सतत हस्तक्षेप केला जात असे. नेहमी बंद पाळला जायचा. बंदचे आदेश सीमेपलीकडून दिले जायचे. सुरक्षा यंत्रणांवर दगडफेकीचे प्रकार वाढले होते, पण गेल्या दोन – तीन वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. बंद आणि दगडफेकीचे प्रकार हा आता इतिहास झाल्याचा दावा नायब राज्यपालांनी केला.
हेही वाचा >>>> काश्मीर, अरुणाचल आमचेच!; चीन, पाकिस्तानला पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले
पूर्वी राजधानी श्रीनगरमध्ये काळोख पडण्यापूर्वी सारे व्यवहार बंद होत असत. सध्या रात्री ११ पर्यंत दललेकच्या परिसरात नागरिक बिनधास्त फिरतात वा दुकानेही रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. ६८ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या राज्यात आठ वर्षांनंतर मोहरमची मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली. तक्रारी करण्यासाठी नागरिक आता पुढे येऊ लागले आहेत. अगदी १९८९ मध्ये घडलेल्या गुन्ह्याची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी त्याचा तपास सुरू करून छडा लावला. अजूनही काही जुनी प्रकरणे पोलीस वा सरकारकडे येत असून त्यांचाही तपास करण्यात येणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. करोनानंतर पर्यटकांचा ओघ वाढला आहे. २०२२ मध्ये १ कोटी ८८ देशी वा विदेशी र्पयटकांनी काश्मीर खोऱ्यात भेट दिली होती. यंदाच्या वर्षांत ऑगस्टअखेपर्यंत १ कोटी २७ लाख पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत, असे ते म्हणाले.