लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. करोनाची दुसरी लाट येताच सामान्यांच्या लोकल प्रवासावर एप्रिल २०२१ पासून निर्बंध होते. मात्र आता दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करता येत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारपासूनच लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईबाहेरच्या लस घेतलेल्या लोकांनाही रेल्वेने प्रवास करु द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबईबाहेरच्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.
“करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.परंतु राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना नोकरी-व्यवसाय,शिक्षण व इतर कारणांसाठी रेल्वेने प्रवास करावा लागतो.परंतु सध्या त्यांना परवानगी नसल्यामुळे त्यांची अडचण होत आहे. हे लक्षात घेता दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा ही नम्र विनंती,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.परंतु राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना नोकरी-व्यवसाय,शिक्षण व इतर कारणांसाठी रेल्वेने प्रवास करावा लागतो.परंतु सध्या त्यांना परवानगी नसल्यामुळे त्यांची अडचण होत आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) August 18, 2021
दरम्यान, सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी मात्र लोकलमधील गर्दी आटोक्यातच असल्याचे चित्र आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांतील प्रवासी संख्येत तुरळक वाढ झाल्याचे दिसत आहे. दररोज लोकल प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त काही प्रमाणात दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांचीही प्रवासात भर पडली. दरम्यान, कल्याण, डोंबिवली आणि बोरिवली, भाईंदर यांसह काही मोजक्याच स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी अधिक आहेत.