एनसीएमच्या दहा कार्यशाळा रद्द; पीएचडी इच्छुक ३०० विद्यार्थ्यांचे नुकसान

देशभरातील स्वायत्त विज्ञान संस्थांना देण्यात येणाऱ्या निधी कपातीचा फटका गणित विषयात पीएचडी करू इच्छिणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना बसला आहे. राष्ट्रीय गणित केंद्राच्या(एनसीएम) निधीत कपात झाल्यामुळे या वर्षी दहा कार्यशाळा रद्द कराव्या लागल्या आहेत. तसेच निधीकपाती अभावी केंद्राच्या स्वतंत्र इमारतीचे स्वप्नही अपुरेच राहिले आहे. देशभरात गणित विषय घेऊन पदवी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विषयात पीएचडी करावी या उद्देशाने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी टाटा मूलभूत विज्ञान संस्था व आयआयटी मुंबई या संस्थेमार्फत राष्ट्रीय गणित केंद्राची स्थापना करण्यात आली. आज देशात गणित हा विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांची संख्या खूपच कमी आहे. यामुळे पीएचडी करू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळते असे नाही. म्हणून या केंद्रातर्फे दर वर्षी देशभरात पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ३० हून अधिक कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या कार्यशाळा निवासी असून पीएचडीच्या पहिल्या वर्षांचा अभ्यासक्रम यामध्ये शिकविला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्व खर्च केंद्रामार्फत केला जातो.

झाले काय?

गणित विषयातील पीएचडीसाठी केंद्राला २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र संस्थेला प्रत्यक्षात दहा कोटींचा निधीच उपलब्ध करून दिला आहे. यामुळे केंद्राला नाइलाजाने त्यासाठी घेण्यात येणाऱ्या १० कार्यशाळा रद्द कराव्या लागल्या आहेत. प्रत्येक कार्यशाळेत ३० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होते. मात्र या दहा कार्यशाळा रद्द झाल्यामुळे यंदा ३०० विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान केंद्र शासनाच्या निधी कपातीच्या धोरणामुळेच होत असल्याचे गणिततज्ज्ञांचे म्हणणे आहे. केंद्रातर्फे आत्तापर्यंत २२० हून अधिक कार्यशाळांचे आयोजन झाले आहे.

हे केंद्र टाटा मूलभूत विज्ञान केंद्र व आयआयटी मुंबई यांनी संयुक्तपणे सुरू केले आहे. या दोन्ही संस्थांच्या कामकाजावर केंद्राने केलेल्या निधी कपातीचा फटका बसला आहे. परिणामी राष्ट्रीय गणित केंद्रालाही हा फटका सहन करावा लागत आहेत. यामुळे या वर्षी आमच्या कार्यशाळांच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी कपात करावी लागली आहे. तसेच केंद्राची स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी आम्ही सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. मात्र निधी अभावी प्रत्यक्ष बांधकामाचे काम सुरू करता येणे शक्य नाही.  एम. एस. रघुनाथन, राष्ट्रीय गणित केंद्राचे प्रमुख.