राज्य सरकारने एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शुक्रवारी २०० कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. परिणामी, निधीअभावी रखडलेले नोव्हेंबर महिन्याचे वेतन एस. टी. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एस. टी. महामंडळाला दर महिन्याला राज्य सरकारकडून ३६० कोटी रुपये देण्यात येत होते. मात्र मंजूर केलेली रक्कम कमी असल्याची टीका एसटीमधील कामगार संघटनांकडून वारंवार करण्यात येत होती. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि अन्य लाभ मिळावे यासाठी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप केला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात काही अंशी वाढ करून यावर तोडगा काढण्यात आला होता.
हेही वाचा >>>मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक
एसटी महामंडळ चार वर्षात फायद्यात येईल, या अटीवर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी देण्याची जबादारी तत्कालिन राज्य सरकारने घेतली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून एस.टी. महामंडळाला दर महिन्याला वेतनासाठी ३६० कोटी रुपये मिळत होते. मात्र जुलै २०२२ पासून शासनाकडून फक्त १०० कोटी रुपये निधी मिळू लागला होते. तुटपुंजा निधी आणि मिळणाऱ्या प्रवासी उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येत होते. शासनाकडून वेळेत निधी न मिळाल्याने नोव्हेंबरचे वेतन ७ डिसेंबर उलटून गेल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. मात्र आता शासन निर्णय जारी झाल्यानंतर लवकरच वेतन मिळेल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.