बालगृहात हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे अखेर मुंबई पोलिसांनी सोमवारी अंत्यविधी केले. गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजी पार्क पोलीस या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेत होते. त्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेशासह विविध ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला होता.
पोलिसांना हसवान निशाद हा मुलगा गिरगाव चौपाटीवर सापडला होता. त्याला ऑगस्टमध्ये माटुंगा येथील बालगृहात ठेवण्यात आले होते. हा मुलगा मानसिकदृष्ट्या अस्थिर असून नीट संवाद साधू शकत नव्हता. चार अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी त्याची बालगृहात हत्या केली होती. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. निशाद जिवंत असताना त्याने केवळ तीन शब्दांत पत्ता सांगितला होता. त्यात पारस शाळा, बस्तीपाडा, स्टार चौक या शब्दांचा समावेश होता. त्याच्या पालकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी पोलीस त्या दिशेने काम करत होते. त्यासाठी दिल्ली व उत्तर प्रदेशात पथके गेली होती. पण त्याच्या कुटुंबियांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर सोमवारी शीव येथे निशादवर अंत्यविधी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा