आरोग्य व जैविक विज्ञान अभ्यासक्रमांना दुसऱ्या क्रमांकाची तर तंत्रज्ञानाला तिसऱ्या क्रमांकाची पसंती
पालक, समवयस्क यांच्या प्रभावाखाली बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा वाणिज्य आदी विद्याशाखांमध्ये प्रवेश घेत असले तरी यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या शास्त्रोक्त कलचाचणीत बहुतांश विद्यार्थ्यांचा कल आश्चर्यकारकपणे चित्र, नृत्य, लेखन, गायन, शिल्प आदी विविध प्रकारच्या कलांकडे (फाइन आर्ट्स) असल्याचे आढळून आले आहे.
वाणिज्य आणि त्या खालोखाल विज्ञान शाखा निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वसाधारण आग्रह दिसतो; परंतु अनेकदा विद्याशाखा निवडण्याचा निर्णय विद्यार्थी पालक, मित्रमंडळी यांच्या प्रभावाखाली घेत असतात; परंतु करिअर निवडीच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आवडनिवड, क्षमता, रस यांचा शास्त्रोक्त कलचाचणीच्या माध्यमातून अभ्यास केला असता तब्बल २,६७,६०५ विद्यार्थ्यांचा ललित कलांकडे ओढा असल्याचे दिसून आले आहे. त्या खालोखाल २,०६,१४५ विद्यार्थ्यांचा आरोग्य व जैविक विज्ञान अभ्यासक्रमाकडे कल दिसून येतो. तर १,४१,४८१ इतके विद्यार्थी तंत्रज्ञान, १,३६,६२० विद्यार्थी मानव्य शाखांमध्ये तर १,००,९७० विद्यार्थी वाणिज्य शाखांमध्ये रस असलेले आढळून आले आहेत.
यंदा दहावीच्या १५,४७,८२५ परीक्षार्थी विद्यार्थ्यांची राज्य शिक्षण मंडळ, व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था यांच्या माध्यमातून कलचाचणी घेण्यात आली होती. या चाचणीच्या निष्कर्षांतून विद्यार्थ्यांचा मानव्य, आरोग्य व जैविक विज्ञान, तंत्रज्ञान, कला, वाणिज्य आणि उपयोजित कला या पाच शाखांमधील कल जाणून घेण्यात आला. काही विद्यार्थ्यांचा एकाच विद्या शाखेकडे स्पष्ट कल दिसून आला. तर काही विद्यार्थ्यांचा एकाच वेळी दोन, तीन, चार आणि पाच विद्याशाखांमध्ये कल दिसून आला आहे. चाचणीबरोबरच आम्ही विद्यार्थ्यांना नेमक्या कुठल्या विषयात रस आहे, हेही विचारले होते. या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या २,६५,७७८ विद्यार्थ्यांचा कलचाचणीतही त्याच विषयाकडे कल असल्याचे आढळून आले होते, असे राज्य शिक्षण मंडळाचे दीपक जोशी यांनी नमूद केले.  कोणत्याही शाखेकडे कल न दिसलेले १,९७८ विद्यार्थी या चाचणीत आढळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा