अल्पसंख्याक महाविद्यालये तसेच व्यवस्थापन, संस्थांतर्गत प्रवेशांचीही पडताळणी
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या जागांबरोबरच अल्पसंख्याक, ‘इनहाऊस’ आणि व्यवस्थापन स्तरावर भरल्या जाणाऱ्या १ लाख १९ हजार जागा भरताना गुणवत्ता आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी संस्थास्तरावरील प्रवेशांची तटस्थ यंत्रणेमार्फत पडताळणी करण्याचेही शिक्षण विभागाने ठरवले आहे.
अकरावी प्रवेशांमधील गोंधळाप्रकरणी निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने प्रवेशांमध्ये सुसूत्रतेसोबत पारदर्शकताही असावी, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार ऑनलाइन आणि संस्थास्तरावरील प्रवेशांची तटस्थ यंत्रणेद्वारे तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या तपासणीत आता संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आहे का, याचीही पडताळणी केली जाईल, अशी माहिती मुंबई शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. अल्पसंख्याक, व्यवस्थापन तसेच संस्थांतर्गत कोटय़ाच्या माध्यमातून अकरावीच्या जवळपास १ लाख १९ हजार ३६५ जागा भरल्या जातात.
अकरावी प्रवेशात असलेली अपारदर्शकता, विद्यार्थी-पालकांची या महाविद्यालयातून त्या महाविद्यालयात होणारी ससेहोलपट व आर्थिक लुबाडणूक यामुळे गेली अनेक वर्षे मुंबई महानगर प्रदेशातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या (एमकेसीएल) मदतीने ऑनलाइन केले जात आहेत. याला अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाऊस जागांचा अपवाद असतो. या जागा भरल्यानंतर उर्वरित जागा ऑनलाइनमध्ये हस्तांतरित करण्यात येतात. मात्र, संस्थास्तरावर भरलेल्या जागा गुणवत्ता आणि नियमानुसार भरल्या आहेत की नाही, हे आतापर्यंत तपासलेच जात नव्हते. त्यामुळे अकरावी प्रवेशात पारदर्शकता आणण्याच्या मूळ हेतूलाच तडा जात होता. या पाश्र्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कोटय़ातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या वर्षीपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरिता सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइनमधून प्रवेश जरी घेतला नाही, तरी या विद्यार्थ्यांची नोंद उपसंचालक कार्यालयाकडे राहणार आहे.

पालघर, भिवंडी वगळले
यंदा मुंबई महानगर प्रदेश परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून पालघर आणि भिवंडी वगळण्यात आले आहेत. उर्वरित मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, रायगड या भागांकरिता पूर्वीप्रमाणेच ऑनलाइनच्या माध्यमातून प्रवेश केले जाणार आहेत. घरापासून असलेले अंतर, प्रवासातील अडचणी यामुळे पालघर, भिवंडी या भागातील विद्यार्थी इतर ठिकाणी सहसा प्रवेश घेत नाहीत. म्हणून येथील महाविद्यालयांचा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभाग करण्यात आलेला नाही, असे बी. बी. चव्हाण यांनी सांगितले. पालघर (५६) आणि भिवंडीमधील (२६) महाविद्यालयांमध्ये संस्था स्तरावर प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येईल.

संकेतस्थळ लवकरच
अकरावी ऑनलाइनकरिता पुढील आठवडय़ात संकेतस्थळ सुरू करण्यात येईल. ही प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबविली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरावी लागते. ही प्रक्रिया २ किंवा ३ मे पासून सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत. दहावीच्या निकालानंतर प्रवेशाचा दुसरा टप्पा सुरू होईल.

एकूण ७१९ महाविद्यालये
अकरावी ऑनलाइन प्रक्रियेत एकूण ७१९ महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. यापैकी सर्वाधिक १८० महाविद्यालये मुंबईच्या पश्चिम उपनगरात आहेत. त्याखालोखाल उत्तर मुंबईत १३३ महाविद्यालये आहेत. दक्षिण मुंबईतील ९१, ठाण्यात ८१, नवी मुंबईत ५६, कल्याण डोंबिवली ६९, उल्हासनगर ४८, रायगड ३३, मीरा भाईंदरमधील २८ महाविद्यालयांचा समावेश ऑनलाइनमध्ये असेल.

Story img Loader