मुंबई : जी. टी. रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तेथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जी. टी. रुग्णालयातील आपत्कालीन विभागामध्ये जुलै – डिसेंबर २०२४ या कालावधीत तब्बल ४ हजार ५९२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी अनेकांवर प्राथमिक उपचार करण्यात आले, तर प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दक्षिण मुंबईतील जी.टी. रुग्णालयाला जुलै २०२४ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे जी.टी. रुग्णालयामध्ये टप्प्याटप्याने अद्ययावत व आधुनिक सोयी – सुविधा उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जी. टी. रुग्णालयामध्ये नवीन सीटी स्कॅन विभाग सुरू करण्यात आला. शस्त्रकियागृहाचे अद्ययावतीकरण करण्यात आले. सहा नवीन शस्त्रक्रियागृह उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर २३ अनुभवी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे इंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, यकृत, पाठीचे मणके, कान – नाक – घसा, नेत्रविभागातील यंत्रसामग्री अद्ययावत करण्यात येत आहे. अपघात विभाग माॅड्यूलर करण्यात आला असून त्याला संलग्नित सहा खाटांचा आपत्कालिन विभाग सुरू करण्यात आला. त्याचबरोबर डे केअर सुविधाही सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक नव्या सोयी-सुविधा पुढील काही काळात रुग्णालयामध्ये सुरू होणार आहे. जी. टी. रुग्णालयातील वाढत्या सोसी सुविधांमुळे रुग्णांचा उपचारासाठी कल वाढू लागला आहे. त्यातूनच जुलै – डिसेंबर २०२४ या कालावधीत रुग्णालयात ४ हजार ५९२ रुग्णांनी आपत्कालीन विभागामध्ये उपचार घेतले. यापैकी २ हजार २९६ रुग्णांना डे केअर सुविधेअंतर्गत उपचार करून घरी पाठविण्यात आले. तर १ हजार ७२९ रुग्णांवर उपचार करून त्यांना पुन:उपचारासाठी (फॉलोअप) बोलविण्यात आले. तसेच आपत्कलिन विभागात आलेल्या ५६७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आल्याची माहिती जी.टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी सांगितले.
जी.टी. रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालय रुपांतर झाल्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुढील काही दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभागाबरोबरच कॅथलॅब, पाच खाटांचे रक्तशुद्धीकरण केंद्र, मॉड्यूलर अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयातील वाढत्या व अद्ययावत सोयी – सुविधांमुळे भविष्यात रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी व्यक्त केली.
उपचार करण्यात आलेले रुग्ण
जुलै – ३६
ऑगस्ट – ८७०
सप्टेंबर – ११३४
ऑक्टोबर – ११०६
नाेव्हेंबर – ७१८
डिसेंबर – ७२८
एकूण – ४५९२