इंद्रायणी नार्वेकर

मुंबई : ‘जी २०’ शिखर परिषदेमुळे सागरी किनारा मार्गाचे मरिन ड्राईव्ह येथील खोदकाम दोन-तीन दिवसांसाठी थांबविण्यात आले आहे. खोदकामातून निघणाऱ्या ओल्या मातीची वाहतूक करताना सांडून रस्ते खराब होतात. त्यामुळे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

‘जी २०’ शिखर परिषदेच्या विकास कार्यगटाची पहिली चार दिवसीय बैठक मुंबईत होत असून या परिषदेला उपस्थित राहणाऱ्या परदेशातील सदस्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील रस्ते अवघ्या काही दिवसात सजवण्यात आले आहेत. या परिषदेच्या तयारीसाठी अगदी शक्ती पणाला लावली आहे. या बैठकांसाठी परदेशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यामुळे विमानतळ परिसरातील रस्त्यांनी कधी नव्हे ती कात टाकली आहे.

हेही वाचा >>> म्हाडा अधिकाऱ्यांना ॲानलाइन सोडतीत घुसवण्याचा डाव उधळला! उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तात्काळ कारवाई

तसेच या बैठका बीकेसी आणि कुलाबा येथे होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाणारे रस्ते सजले आहेत. तसेच हे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून मरिन ड्राईव्ह येथील सागरी किनारा मार्गाचे कामही थांबवण्यात आले आहे. सागरी किनारा प्रकल्पांतर्गत दोन समांतर बोगदे खणण्याचे काम सुरू आहे. प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या स्वराज्यभूमीलगतच्या ‘छोट्या चौपाटी’पर्यंत हे बोगदे खणले जात आहेत. त्यापैकी एक बोगदा खणून झाला आहे व दुसऱ्या बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र बोगदा खणताना मोठ्या प्रमाणावर ओली माती निघते. ही माती वाहून नेताना काही प्रमाणात ती रस्त्यावर पडते व रस्ते खराब होतात.

हेही वाचा >>> मुंबईः बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून ई-व्हिसाची विक्री; अनिवासी भारतीय महिलेची फसवणूक

वाहनांच्या चाकाला माती लागते. परदेशातील प्रतिनिधींच्या सोयीसाठी महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रदुषणामुळे मुंबईत बांधकामांवर दहा दिवसांसाठी निर्बंध घालण्यात आलेले असले तरी सागरी किनारा मार्गाचे काम सुरूच राहणार आहे. या कामातून धुळीची निर्मिती होत नाही. समुद्र किनाऱ्यामुळे माती ओली असते व धूळ असली तरी ती आर्द्रतेमुळे खाली बसते. त्यामुळे हे काम थांबवण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader