|| भक्ती परब

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’ वाहिनीवर अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘गाव गाता गजाली’ ही मालिका १३ सप्टेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रात्री १० वाजता पुन्हा दाखवण्यात येणार आहे.

अल्प विश्रांतीनंतर पुन्हा परतणार असल्याचे आश्वासन आम्ही मालिकेच्या शेवटच्या भागात प्रेक्षकांना दिले होते. त्याप्रमाणे पुनरागमन करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असे या मालिकेत ‘पांडू’ची भूमिका साकारणारे अभिनेते आणि या मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी सांगितले.

या मालिकेच्या नव्या भागांचे चित्रीकरण कोकणातच करण्यात येणार आहे. कलाकारांचा तोच संच असणार आहे. कोकणातील गावांमधील काही नव्या कलाकारांना या मालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

या गजालींमध्ये नावीन्य असेल आणि कोकणातील गावाकडची माणसे पुन्हा एकदा बघायला मिळतील. नव्या कथा प्रेक्षकांना पाहता येतील. यावेळी लेखकांच्या टीममध्ये नवे लेखक असणार आहेत. प्रभाकर भोगले, अंबर हडप आणि ओंकार दीक्षित यांच्यासोबत कोकणातील इतर काही स्थानिक लेखकही लेखन करणार आहेत, असे कुडतरकर यांनी सांगितले. याविषयी ‘झी मराठी’चे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर म्हणाले की, ‘गाव गाता गजाली’मालिका प्रेक्षकांची आवडती होती. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ती पुन्हा सुरू करत आहोत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaav gata gajali