मुंबई : भाजप संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत बुधवारी पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना वगळले. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देऊन भाजपने त्यांना पदोन्नती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीची पुनर्रचना करताना माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना वगळण्यात आले आहे. गडकरी यांच्याऐवजी पक्षाने राज्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक समितीत स्थान दिले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा यांना पुन्हा संधी देण्यात आली आह़े  

राज्यात सत्ताबदलानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यावेळी जाहीर करणाऱ्या फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा जाहीर आदेश पक्षाध्यक्ष नड्डा यांनी दिला होता. पण, पक्षाच्या निवडणूक समितीत फडणवीस यांना स्थान देऊन पक्षाने त्यांचे महत्त्व अधोरेखित केल्याचे मानले जात़े  तसेच भविष्यात फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हा संदेश पक्षाने दिला आहे.

पक्षनेतृत्वाच्या आदेशामुळे गेल्या वर्षी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पा यांनाही निवडणूक समितीत स्थान देण्यात आले. आपल्या राजीनाम्यानंतर मुलाला मंत्रिपद नाकारण्यात आल्याने येडियुरप्पा यांनी नाराजी व्यक्त केली होती. तरीही पक्षाच्या महत्त्वाच्या समितीत येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला. त्यातून येडियुरप्पा हे कर्नाटकच्या पक्षांतर्गत राजकारणात हस्तक्षेप करणार नाहीत, अशी व्यवस्था पक्षाने केल्याचे मानले जाते.

इक्बालसिंग लालपुरा यांची नियुक्ती करून पक्षाने शीख समाजातील नेत्याला सर्वोच्च समितीत संधी दिली आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्ष व तमिळनाडूतील नेत्या वनथी श्रीनिवास, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, राजस्थानमधील नेते ओम माथूर, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के. लक्ष्मण, हरयाणातील सुधा यादव, आसामचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हे समितीचे अन्य सदस्य असतील.

संसदीय मंडळाचे सदस्य:

पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, बी़  एस़  येडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बालसिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि बी. एल. संतोष

केंद्रीय निवडणूक समिती:

संसदीय मंडळातील सर्व ११ सदस्य. याशिवाय देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव, ओम माथूर आणि वनथी श्रीनिवास