मुंबई : नागपूर शहराच्या अनेक भागांत शुक्रवारी जी पूरस्थिती निर्माण झाली, ते सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट आणि अनियंत्रित कारभाराचे पाप असून दहा हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवन उपयोगी साहित्य खराब झाले आहे. हजारो दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकही संकटात सापडले आहेत. नुकसानीच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा >>> “मोदींनी स्वतःच्या पैशाने जनधन खाती उघडली का?”, अंबादास दानवेंचा प्रश्न, म्हणाले, “हा पैसा…”
नागपूर शहरातील पूर परिस्थिती ही गेल्या काही वर्षांतील नागपूर महानगरपालिका आणि विद्यमान भाजप सरकारच्या भ्रष्ट आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे. नागपूर शहरातील दहा हजारांहून अधिक घरांमध्ये चिखल साठला आहे. हीच परिस्थिती शहरातील हजारो दुकानांची आहे. अनेक दुकानांनी मोठय़ा प्रमाणात मालाची खरेदी केली होती. मात्र अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण माल खराब झाला आहे. सरकारने रहिवाशांना प्रत्येकी १० हजार आणि दुकानदारांना ५० हजारांपर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे.