‘पूर्ती’ प्रकरण नितीन गडकरी यांचा पिच्छा सोडत नसल्याचे पुन्हा दिसू लागले असून या प्रकरणाच्या ‘सीबीआय’ चौकशीच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली आहे. त्यात त्यांनी ८०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्याच्या चौकशीची गरज असून ती ‘सीबीआय’द्वारेच करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.
गडकरी यांच्याशी संबंधित ‘पूर्ती’ समूहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या मुंबईत नोंदणीकृत आहेत; परंतु या गुंतवणूकदार कंपन्या अस्तित्वात आहेत का, त्यांचे पत्ते, व्यवसायाचे स्वरूप पाहण्यासाठी, आर्थिक नोंदी व अधिकारपत्रे यांची प्राप्तिकर खात्यातर्फे तपासणी करण्यात आली असता या सर्व कंपन्या बनावट असल्याचे आणि त्यांचे पत्ते चुकीचे असल्याचे उघड झाले होते.
‘पूर्ती’ समूहाची स्थापना गडकरी यांनी केल्याचा आरोप तिरोडकर यांनी याचिकेत केला आहे. या समूहाच्या उभारणीसाठी त्यांनी कशी व कुठून गुंतवणूक केली, असा मुद्दा उपस्थित करीत त्याची चौकशी होण्याची गरज आहे.
‘पूर्ती’ आणि ‘आयआरबी’ या कंपन्यांमध्ये नेमके काय साटेलोटे आहे, याचीही चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.