भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत किरीट सोमय्या यांना स्थान मिळू शकले नसून, यामागे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची नाराजी कारणीभूत असल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी त्याला वाऱ्यावर सोडल्याने चुकीचा संदेश गेल्याची प्रतिक्रिया पक्षात व्यक्त करण्यात येत आहे.   सोमय्या यांनी विविध घोटाळे बाहेर काढून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. जलसंपदा घोटाळ्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करू नये म्हणून सोमय्या यांच्यावर पक्षातूनच दबाव आला होता, पण त्याकडे दुर्लक्ष करून याचिका दाखल केली होती. सोमय्या यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर विविध आरोप करून न्यायालयात त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.  तेच तटकरे हे नागपूरचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नागपूरमध्ये गडकरी यांच्या मदतीला धावून गेले होते. हा संदेश सोमय्या यांच्यासाठी पुरेसा बोलका होता, असे पक्षाच्या वर्तुळात बोलले जाते. गडकरी यांच्यावर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांना पक्षातील मुंबईचे नेते मदत करीत असल्याची चर्चा रंगली होती. सोमय्या यांना वगळताना मुंबईतून पूनम महाजन यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच माजी मंत्री राम नाईक यांना नव्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. ते पक्षाच्या शिस्तभंग समितीचे सदस्य होते.  पक्षात लढवय्या अशी प्रतिमा असलेले सोमय्या हे भाजपमध्ये आता कोणत्याच पदावर नाहीत. ईशान्य मुंबईतून लढण्याची त्यांनी तयारी सुरू केली असताना लागोपाठ दोनदा पराभूत झाले या मुद्दय़ावर त्यांचा पत्ता कापण्याचे प्रयत्न होऊ शकतात, असे पक्षात बोलले जात आहे. अर्थात, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आशीर्वाद असल्याने सोमय्या यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही.

Story img Loader