मुंबई : विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपने आणलेली नवी संस्कृती आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे, वस्तू सेवा कर, राम मंदिर उभारणी अशी चांगली कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत, पण त्यांच्यात आता एक प्रकारचा रुबाब आला आहे. त्यामुळे त्यांनी ‘४०० पार’चा नारा देण्याऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण मित्र पक्षांचाही मान राखावा, असा उपारोधिक सल्ला शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी गुरुवारी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे हे एकट्या भाजपचे स्वप्न नाही. त्यात मित्रपक्षांचाही सहभाग आहे. शिवसेना शिंदे गटाची एक मतपेढी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी खेड्यापाड्यापर्यंत ही संघटना बांधली आहे. त्यामुळे आमचा मान राखला गेला पाहिजे, असे कीर्तिकर सुनावले.

हेही वाचा >>>महायुतीत दोन जागांचा तिढा अद्याप कायम; रत्नागिरी-सिंधुदुर्ग, साताऱ्यासह ११ मतदारसंघांत आजपासून निवडणूक प्रक्रिया

पुत्र अमोल कीर्तिकर यांची ईडीमार्फत चौकशी सुरू असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही. हे ईडीचे अधिकारीसुद्धा खासगीत कबूल करीत आहेत. करोना काळात अनेक जम्बो उपचार केंद्र सुरू करताना वैद्याकीय साहित्य पुरवठा करावा लागला होता. त्यात रुग्णांसाठी खिचडी पुरवठ्याचाही समावेश होता. संजय माशेलकर यांनी हा पुरवठा करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली. या कंपनीसाठी पुरवठा करण्याचे काम अमोल कीर्तिकर याने केले. त्यात नफा झाला. त्याचा मोबदला सर्वांना धनादेशाद्वारे देण्यात आला. त्यावर प्राप्तिकरही भरण्यात आला आहे. त्यात घोटाळा वगैरे काही नाही,’’ अशा शब्दांत कीर्तिकर यांनी मुलाची बाजू मांडली. तर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे निवडणूक लढवत असलेल्या माझ्या मुलाच्या विरोधात मी प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपला इशारा?

महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटातील सर्वच्या सर्व १३ खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात खदखद आहे. या नाराजीला कीर्तिकर यांनी वाट करून दिल्याचे मानले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार सभांत पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असताना त्यांचे एक खासदार थेट मोदींवर टीका करीत आहेत. ही टीका म्हणजे शिंदे गटाने भाजपला दिलेला इशारा आहे, असे मानले जाते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajanan kirtikar criticizes narendra modi for guarding parliament amy