गजानन कीर्तिकर (शिवसेना), उत्तर-पश्चिम मुंबई
अंधेरी ते गोरेगाव, िदडोशीपर्यंत पसरलेल्या या मतदारसंघातील प्रश्न वेगवेगळे आहेत. तरीही अनेक प्रश्नांमध्ये हात घालण्याचा खासदार कीर्तिकर यांनी प्रयत्न केला. वेसाव्यातील कोळी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहे. अंधेरी पश्चिम तसेच गोरेगाव, दिंडोशी परिसरातील म्हाडा वसाहतींच्या भिजत पडलेल्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर कीर्तिकर यांनी अनेक आश्वासने दिली होती. परंतु प्रत्यक्षात यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. पुनर्विकास ठप्प असल्यामुळे या मतदारसंघातील अनेक रहिवासी नाराज आहेत. जुहू-सातबंगला येथील समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण, आंबोली रेल्वे फाटकात पादचारी पूल, दिंडोशीतील न्यू म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा, नागरी निवारा प्रकल्पातील करारनामे यांसह ओशिवरा स्थानक, अंधेरी-गोरेगाव हार्बर लाइन आदी प्रश्नांनाही त्यांनी हात घातल्याचे दिसून येते. मात्र वर्षभराच्या कालावधीत या बाबींना म्हणावा तसा वेग आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
गेले खासदार कुणीकडे? – गुरुदास कामत (काँग्रेस)
कुठे आहेत खासदार, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. पराभूत झालो म्हणून मी नव्हे तर लोकच मला विचारत आहेत. आमच्या काळातील प्रकल्पांचेच श्रेय घेतले जात आहे. आम्ही ओशिवरा स्थानक मंजूर करून घेतले. वेसाव्यात मिनी पोर्टसाठी दीडशे कोटी मंजूर केले. असे अनेक प्रस्ताव मंजूर करून घेऊनही वर्षभरात त्याचा पाठपुरावा केला गेलेला नाही. केंद्रात सत्ता असूनही त्याचे अजिबात प्रतिबिंब लोकोपयोगी कामात दिसून येत नाही.
कोळीबांधवांच्या प्रश्नांना प्राधान्य
आतापर्यंतच्या खासदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, याची जाणीव आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची यादी तयार करून ते सोडविण्याच्या दिशेने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोळीबांधवांच्या प्रश्नांना आतापर्यंत कोणीही स्पर्श केला नव्हता. त्याला मी प्राधान्य दिले. निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची मला कल्पना आहे. ज्या ज्या वेळी मी मुंबईत असतो तेव्हा लोकांसाठी उपलब्ध असतो. लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहिला आहे.
– गजानन कीर्तिकर
निशांत सरवणकर