आयपीएल सामन्यांच्या वेळी स्पॉट फिक्सिंगशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा दाऊद टोळीच्या वतीने छोटा शकीलने केल्यानंतरही थेट दाऊदचाच संबंध प्रस्थापित झाल्याचे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात स्पष्ट केले आहे. मुंबई पोलिसांतील सूत्रांच्या माहितीनुसार, सट्टय़ावर संपूर्ण नियंत्रण आतापर्यंत दाऊद टोळीचेच राहिले आहे. शरद शेट्टीची हत्या झाल्यानंतर ही सूत्रे छोटा शकीलकडे असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. दुबईमधील जावेद चौटानी आणि पाकिस्तानातील सुलेमान या दोघांशी थेट संपर्क असल्याचे अनेक बुकींनी पोलिसांकडे स्पष्ट केले आहे.
सुनील दुबई हाही एक महत्त्वाचा मोहरा आहे. याशिवाय देवेंद्र कोठारी, रमेश व्यास हेही या प्रकरणातील महत्त्वाचे सूत्रधार आहेत. थेट दाऊदच भाव निश्चित करतो आणि त्यानंतर त्याचे पंटर्स त्यावर आधारीत सट्टा घेतात, असेही गुन्हे अन्वेषण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. सट्टा वेगगेवळ्या प्रकारचा असला तरी त्याचे सर्व भाव दाऊद टोळीमार्फतच निश्चित केले जातात. दाऊद टोळी पैसे देत नाही. फक्त हवालामार्फत कोटय़वधी रुपये घेते, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
भारतीय गुप्तचर यंत्रणेने सट्टेबाजीत थेट दाऊदचाच आवाज ऐकल्यामुळे आता त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले असले तरी मुंबई पोलिसांनी वेळोवेळी जे बुकी पकडले त्यांच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. सट्टा हा संपूर्णपणे विश्वासावर अवलंबून असल्यामुळे काही वेळा मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले तर समोरून पैसे दिले जात नाहीत. अशावेळी गुंड टोळीचा उपयोग होतो. गुंडगिरीच्या जोरावर ही वसुली केली जाते. दाऊदचे काही गुंड मग या पंटर्सच्या मदतीला येतात. दाऊदचा थेट फोन येतो. त्यानंतर हवालामार्फत कोटय़वधी रुपये पाठविले जातात. मात्र ते दुबईमार्गे दाऊदपर्यंत पोहोचतात, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. ‘स्पॉट फिक्सिंग’मध्ये दाऊदचा वरदहस्त असल्याशिवाय कुठलाही सट्टेबाज मोठे पाऊल उचलीत नाही. दाऊद आजही सट्टेबाजारातील उलाढालीवर  मोठय़ा प्रमाणात अवलंबून असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
भारत – झिंबाब्वे
सामन्यावरही सट्टा
भारत आणि झिंबाब्वे सामन्यावरही मोठय़ा प्रमाणात सट्टा लावण्यात आला होता. दाऊद टोळीकडून भारताच्या बाजुने ५५ पैसे तर झिंबाब्वेच्या बाजुने सव्वा रुपया निश्चित करण्यात आला होता. आता बॅटमिंटन लिग सामन्यांवरही सट्टा खेळला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.