देशात सायबर गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्हॉट्सअॅप, फोन, मेसेज किंवा अन्य माध्यमांतून नागरिकांना गंडा घातल्याचे प्रकारही समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. एका ५३ वर्षीय महिलेला जेवणाची ऑर्डर देणे चांगलेच महागात पडले आहे. या महिलेला सायबर चोरांनी ८७ हजार रुपयांना गंडा घातला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
मुंबईतील एका महिलेने ऑनलाईन जेवण मागवले होते. यासाठी सायबर ठगांनी पैसे पाठवण्यासाठी एक लिंक दिली होती. पहिल्यांदा महिलेला ५ रूपये टाकण्यास सांगितले. महिलेने लिंकवर क्लिक करताच काही वेळात ८७ हजार रूपये तिच्या अकाउंटमधून उडाले.
हेही वाचा : आयआयटीतील दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण; चिठ्ठीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांला अटक
याप्रकरणी महिलेने ७ जानेवारीला मुंबईतील गांवदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या तीन जणांना गांवदेवी पोलिसांनी झारखंडमधून अटक केली. त्यांच्यावर माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने याबाबत वृत्त दिले आहे.