मुंबई : गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी षोडशोपचार पूजा केल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतींना भाविकांनी रविवारी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यंदा करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यामुळे समुद्रकिनाऱ्यांसह विसर्जनस्थळी मिरवणुका निघाल्या.
गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर रविवारी पाच दिवसांच्या गणेशाला भाविकांनी निरोप दिला. गिरगाव, दादर, जुहू चौपाटीसह ठिकठिकाणच्या नैसर्गिक आणि मुंबई महापालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विसर्जनस्थळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालांची उधळण करीत भाविक ढोल-ताशाचा तालावर थिरकत होते.
१७ हजार ५३६ मूर्तीचे विसर्जन..
रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत १७ हजार ५३६ घरगुती गणेश मूर्तीचे, २६१ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे, तर २३ हरितालिकांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यापैकी कृत्रिम तलावात ६ हजार ८१८ घरगुती, तर १३१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे, तसेच १६ हरितालिकांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
लालबाग, काळाचौकी परिसरात वाहतुकीत बदल
मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तांची गर्दी होत असल्याने लालबाग आणि काळाचौकी परिसरातील रस्ते शुक्रवारी, ९ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत वाहनांसाठी बंद राहणार आहेत.
भायखळा वाहतूक विभागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, भाविकांना वाहनांचा त्रास होऊ नये, यासाठी काही मार्ग आठवडाभर बंद राहणार आहेत. तर, या ठिकाणी वाहन उभे करण्यास वाहतूक पोलिसांकडून मनाई केली आहे.
गिरणगावातील सार्वजनिक मंडळांच्या गणपती दर्शनासाठी देशभरातून भक्त येत आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. या परिस्थितीत परिसरात वाहने चालवणे अवघड होत असल्याने येत्या शुक्रवापर्यंत काही मार्ग बंद केले आहेत, तर पर्यायी मार्ग खुले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.
हे मार्ग बंद..
* डॉ. बी. ए. रोड: भारतमाता जंक्शन ते बावला कम्पाऊंड (डी. के. रोड जंक्शन)
* डॉ. एस. एस. राव रोड : गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकीपर्यंत
* दत्ताराम लाड मार्ग : श्रावण यशवंते चौक ते सरदार हॉटेलपर्यंत
* साने गुरुजी मार्ग : संत जगनाडे चौक/ गॅस कंपनी जंक्शन ते आर्थर रोड नाकापर्यंत
* गणेशनगर लेन, चिवडा गल्ली- पूजा हॉटेल ते डॉ. बी. ए. रोडपर्यंत
* दिनशॉ पेटीट लेन : चव्हाण मसाला ते डॉ. बी. ए. रोडपर्यंत
* टी. बी. कदम मार्ग : व्होल्टास कंपनी ते उडीपी हॉटेलपर्यंत